- गौरी पटवर्धन
तुमच्या घराला छोटी तरी बाल्कनी आहे का? किंवा अंगण? किंवा सोसायटीत एखादा कोपरा तुम्ही वापरू शकता का? किंवा गच्चीत? तर त्यातून तुम्हाला एक भारी प्रकल्प करता येईल. त्यासाठी साहित्य जे लागणार आहे ते म्हंटलं तर साधं आहे आणि म्हंटलं तर तुम्हाला घरातून जरा खटपट करून मिळवायला लागेल असं आहे. कारण त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक जुना माठ किंवा बादली किंवा टब. अर्थात यातलं काही नवीन मिळालं तरी आपल्याला चालणार आहे, पण आपल्याला कोण भलते उद्योग करायला नवीन माठ किंवा बादली देईल? म्हणून जुन्या वस्तू!तर आपल्याला जो माठ / बादली / टब मिळेल त्याला बाजूला छोटी भोकं पाडून घ्यायची. त्यामुळे बादलीत हवा खेळती राहते. हे आपलं कंपोस्ट बिन. किंवा खताचा डबा. आता त्याच्या तळाशी साधारण एक इंच भुश्याचा थर द्यायचा. घरात भुसा नसेल तर नारळाच्या शेंड्या घाला किंवा एखाद्या पुठ्ठयाच्या खोक्याचे बारीक तुकडे करून ते घाला. आता घरात ज्या कुठल्या पालेभाज्या निवडतील त्यांची देठं, सोललेल्या भाज्यांची सालं, फ्लॉवर सारख्या भाजीचा उरलेला जाडजूड देठ, चहा पावडरचा चोथा अशा सगळ्या गोष्टी तुम्ही या कंपोस्ट बिन मध्ये टाकू शकता. फक्त हा ओला कचरा टाकतांना काही गोष्टींची काळजी घ्यायची.1. सगळा कचरा बारीक तुकडे करून टाकायचा2. त्यात ओला असणारा कचरा टाकायचा नाही. कंपोस्ट बिनमध्ये पाणी जाऊ द्यायचं नाही.3. प्रत्येक वेळी हा स्वयंपाकघरातला कचरा टाकला की त्यावर सगळा कचरा झाकला जाईल इतका भुसा पसरायचा. त्यावर खत होण्याची प्रक्रिया लौकर होण्यासाठी गुळाचं पाणी, आंबट ताक, थोडं डाळीचं पीठ/बेसन, गोमूत्र, शेणाचं पाणी यातलं जे काही तुम्हाला मिळेल ते घालायचं.4. कंपोस्ट बिन झाकून ठेवायचं.5. चांगल्या तयार होणा?्या खताला अजिबात घाण वास येत नाही, पण काही वेळा त्यात अळ्या होऊ शकतात. त्या त्रसदायक नसतात.6. आपलं कंपोस्ट बिन पूर्ण भरलं की आठ दिवस जाऊ द्यायचे. त्यानंतर दर दोन दिवसांनी काठीने त्यातला कचरा ढवळायचा. बाहेर न सांडता जमेल तेवढा खालीवर करायचा.
उन्हाळ्याच्या दिवसात साधारण एक महिना ते चाळीस दिवसांनंतर तुम्हाला वाळवलेल्या चहा पावडर सारखं दिसणारं खत मिळेल. हे खत तुम्ही तुमच्या घरच्या झाडांना घालू शकता. ही प्रक्रिया तुम्हाला सतत चालू ठेवायची असेल तर एका वेळी दोन - तीन कंपोस्ट बिन बनवा. एक पूर्ण भरली की दुसरी वापरायला सुरुवात करायची. अशाने घरातला कचरा आपल्याला घरात जिरवता येतो. आपलं शहर / गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याकडून तेवढीच थोडी मदत!