या करोनाने एक बरं केलंय, सगळी माणसं दिवसरात्र घरात बसवून ठेवलेली आहेत. त्यामुळे साहजिकच ती रोज रोज तीच तीच कामं करून कंटाळलेली आहेत. आणि त्यामुळेच एरवी आपल्याला जे फार फार करायची इच्छा असते आणि आपल्याला जे कोणीच करू देत नाही अशी कामं शिकण्याची आणि करून बघण्याची - थोडक्यात मोठ्यांच्या मध्ये मध्ये लुडबुड करण्याची- संधी आपल्याला मिळालेली आहे. प्रश्न असा आहे की आपण या संधीचं सोनं कसं करणार? म्हणजे आपण या संधीचं सोनं करू शकतो का? आपल्याला जगण्यासाठी लागणा?्या काही बेसिक गोष्टी या काळात आपण शिकू शकतो का? उदारहरणार्थ कूकर लावणो.काही मुलींना एव्हाना कुकर लावता येत असेल. त्यांचा विषय आपण थोडा बाजूला ठेऊ. पण अनेक मुली आणि बहुतेक सगळ्या मुलांना दहावी झाली तरी साधा कूकरसुद्धा लावता येत नाही ही गोष्ट खरी आहे. खरं म्हणजे स्वयंपाकघरात करायचं सगळ्यात सोपं काम म्हणजे कूकर लावणं. कारण त्यासाठी फार काही मोठी कृती नसते, ते काम काही सतत ओट्यापाशी उभं राहून करायचं नसतं. एकदा कूकर गॅसवर ठेवला की निवांत बसून घड्याळाकडे लक्ष ठेवणं एवढंच काम असतं.त्यात फक्त होतं काय, की तुमच्या घरचा कूकर कसा लावायचा हे तुम्हाला घरीच कोणालातरी विचारायला लागेल. कारण प्रत्येक कूकर, डाळ, तांदूळ आणि बटाट्यांना स्वत:चा ?टिट्यूड असतो. त्यामुळे कुठल्या कूकरच्या कुठल्या पदार्थाला किती शिट्या करायच्या, कुठल्या तांदुळाला किती जुना झाल्यावर किती पाणी घालायचं, कोणाच्या घरी कुठल्या डाळीचं वरण करतात, ती डाळ डायरेक्ट कूकरला लावायची का आधी भिजवून ठेवायची, डाळीत थोडं तेल घालायचं का नाही, भातात मीठ घालायचं का नाही या गोष्टी प्रत्येक घराप्रमाणो बदलतात. पण तुम्ही दोन दिवस आई समोर असतांना कूकर लावलात की तुम्हाला तो सहज लावता येईल.आत्ता कुकर लावायला शिकून घ्या. आणि केव्हातरी आई दिवसभराच्या कामाने दमल्यावर ‘तू रात्री काही करू नकोस, मी करते/करतो वरणभात!’- असं तिला म्हणा!
= हे एकदा करून बघा, साधा कूकर लावता येणं इतकं महत्वाचं का असतं ते!टीप : खरं म्हणजे कूकरच्या शिट्ट्या करायच्याच नसतात. पण आत्ता तुम्ही आई सांगेल त्या पद्धतीने शिका. शिट्ट्यांचं गणित शाळा सुरु झाल्यावर विज्ञानाच्या शिक्षकांकडून समजून घ्या.