घरात बसून सारखा किती टीव्ही बघणार? घरकामात आईला तरी किती मदत करणार? काहीतरी अॅडव्हेंचर्स करावंसं वाटतंच ना? पण करणार काय? इथे आईबाबा बिल्डिंगच्या खाली पार्किगमध्ये चक्कर मारून यायलाही परवानगी देत नाहीत. घराच्या एक -दोन खोल्यांमध्ये किती वेळा इकडून तिकडे करणार ना? आणि त्यात कुठलं आलंय अॅडव्हेंचर?म्हणूनच कंटाळा घालवायला तुम्ही मस्त एखादा सायन्स एक्सपेरिमेंट करा. आता तुम्ही म्हणाल, ते शाळेचं पुस्तक तेवढं उघडायला सांगू नका. पुस्तक नकोच. गुगल मावशी आहे की!
तर गुगलवर सायन्स प्रोजेक्ट्स फॉर किड्स असं सर्च केलं की भरपूर साइट्सची माहिती समजेलच. पण इतकी शोधाशोध करायचा कंटाळा आला असेल तर सायन्स बॉब म्हणून एक साइट आहे त्यावर डायरेक्ट जा. या साइटवर निरनिराळे विज्ञानाचे प्रयोग आहेत, विज्ञान प्रदर्शनाच्या कल्पना आहे. सायन्स ब्लॉग्ज आहेत. त्यातला एखादा प्रयोग, ज्याचं साहित्य घरात सहज उपलब्ध असेल तो करा. तुमचाही वेळ छान जाईल आणि एका नव्या साइटची माहितीही कळेल. काय करा?या साइटवर जाण्यासाठी science bob असं गुगलवर सर्च करा.