तुम्हाला कोणत्या हिरोची बॉडी आवडते? सलमान खान, शाहरुख खान, आमीर खान, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ? काही जणांची बॉडी किती सॉल्लीड असते ना?काहींच्या पोटावर तर त्या विटा असतात. कोणाच्या पोटावर सहा, तर काहींच्या तब्बल आठ-आठ! त्याला ‘सिक्स पॅक’, ‘एट पॅक’ असं म्हटलं जातं. अनेकांना, विशेषत: मुलांना अशी तगडी, फिट्टंफाट बॉडी फार आवडते.पण त्यासाठी किती मेहनत, किती व्यायाम करावा लागतो, हे तुम्हाला माहीत आहे का?
सिक्स पॅक किंवा एट पॅकचं जाऊ द्या, त्याच्या वाटय़ाला आपल्याला चुकूनही जायचं नाही, पण पोटाचा व्यायामही आपल्यासाठी फार महत्त्वाचा.असाच एक, दिसायला सोपा, पण करायला अवघड असा एक व्यायाम आज मी तुम्हाला सांगणार आहे. आपलं पोट आटोक्यात ठेवायचं असेल, मुख्य म्हणजे पोटाची ताकद वाढवायची असेल, तर हा व्यायाम खूप महत्त्वाचा.याला इंग्रजीत म्हणतात प्लॅँक.कसा करायचा हा व्यायाम?1- आपले हात, म्हणजे फोरआर्म्स, जमिनीवर टेकवा. हातांमध्ये खांद्याइतकं अंतर हवं.2- आपल्या शरीराचं वजन हातांवर द्या.3- बिलकुल हलू नका. पाठ आणि मान सरळ ठेवा.4- आपली पाठ आणि शरीरही एका रेषेत असलं पाहिजे. 5- कंबर थोडीशी वर उचललेली हवी. पायांमध्येही थोडंसं अंतर आणि पायाची बोटं जमिनीवर टेकवा.6- लक्षात ठेवा, आपल्या शरीराचं संपूर्ण वजन आपले फोरआर्म्स आणि पायाची बोटं यावर विभागलेलं असावं. तुम्हाला जमेल तितकं, पण सध्या तरी तीस सेकंदाचा एक सेट यापेक्षा जास्त वेळ हा व्यायाम करू नका. नंतर आपोआप तुमचा स्टॅमिना वाढेल. यामुळे तुमच्या पोटाची ताकद वाढेल. पाठदुखीचा त्रस असेल, तर तोही कमी होईल किंवा पाठ दुखणार नाही. तुमच्या मसल्सची लवचिकता वाढेल. पण लक्षात ठेवा, तुमच्यासाठी सुरुवातीला ही लिमिट आहे फक्त तीस सेकंदांसाठी. त्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला जमलं तरी सुरुवातीला ते करू नका.
तुमचीच ‘हिरो’, ऊर्जा