तुमच्यापैकी अनेकांना तुमच्या शिक्षकांनी, नाहीतर तुमच्या पालकांनी अनेकदा सांगितलं असेल, ताठ उभं राहा. असे लुळ्यापाळ्यासारखे का उभे राहता म्हणून.म्हणजे फक्त उभे असतानाच नाही, अनेकांना तर बसलेले असतानाही पाठीचा गोळा करुन बसायची सवय असते. पण ही सवयच नंतर आपल्याला घातक ठरते. अनेकांना पाठीचा त्रस सुरू होतो. थोडा वेळ बसलं तरी पाठ दुखायला लागते. पण हे टाळायचं असेल तर पाठीचे व्यायाम करायलाच हवेत. अनेकदा लहान मुलांचीही पाठ दुखते. कारण एकतर पाठीत ताकद नसते, लवचिकता नसते आणि बसण्याची, उभं राहण्याची पद्धत चुकीची असते.पण आज मी तुम्हाला एक व्यायाम सांगणार आहे. पाठीसाठी हा व्यायाम खूपच चांगला आहे. त्यामुळे तुमची उठण्या-बसण्याची पद्धत तर सुधारेलच, पण पाठीचा त्रस होण्याची शक्यताही खूपच कमी होईल. अनेकांना लोअर बॅकचा त्रस होतो, म्हणजे पाठीच्या खालच्या भागात दुखतं. त्यासाठीचा व्यायाम आहे ‘लोअर बॅक रोटेशनल स्ट्रेचेस’!भारी वाटतं ना हे नाव ऐकायलासुद्धा? आणि ते कठीण असेल असंही वाटतं.पण हा व्यायाम तुलनेनं सोपा आहे.आपण काही वेळा जसं डोक्याला ताण देतो, तसं पाठीला ताण द्यायचा फक्त. बसल्या बसल्यासुद्धा हा व्यायाम करता येतो, पण त्याची पद्धत मी तुम्हाला नंतर सांगेन.कसा कराल हा व्यायाम?1- जमिनीवर अंथरायला एखादी सतरंजी नाहीतर मॅट घ्या. सरळ त्यावर झोपून घ्या.2- आता दोन्ही हात जमिनीला समांतर पसरा.3- आपले दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा. 4- हात जमिनीला टेकलेले असतानाच आपले दोन्ही पाय कंबरेपासून फिरवून जमिनीच्या एका बाजूला टेकवा.5- पाच सेकंद त्याच अवस्थेत राहा.6- लक्षात ठेवा, हात मात्र उचलायचे नाहीत, ते वाकडेतिकडे होऊ द्यायचे नाहीत.7- आता असंच दुस:या बाजूनंही करा.
काय होईल या व्यायामामुळे?
1- पाठीचा, विशेषत: पाठीच्या खालच्या भागाला व्यायाम मिळेल.2- लवचिकता वाढेल.3- पाठ मजबूत होईल. 4- चपळता आणि स्फूर्ती वाढेल.करा हा व्यायाम, म्हणजे कोणाला पाठ दाखवायची वेळ तुमच्यावर येणार नाही!- तुमचीच एक्सरसाइज फ्रेंड, ऊर्जा