तुम्ही नियमित पुस्तकं वाचता?मग सध्याच्या वेळाचा उपयोग करून तुम्ही सुंदर बुकमार्क्स बनवू शकता. जे पुढे तुम्हाला स्वत:ला तर वापरता येतीलच पण मित्रमैत्रिणींना किंवा इतर कुणालाही तुम्हाला भेट देता येतील. एरवी कागद, पुठ्ठा उभा कापून आपण बुक मार्क्स बनवतोच पण काही वेगळ्या कल्पना राबवून बघायला काय हरकत आहे?
प्रकार 1 साहित्य: घरात असलेली तीन रंगांची लोकर आणि एक मोठ्या आकाराचं बटण. कृती: 1) तीन रंगांच्या लोकरीची वेणी घाला. 2) सर्वसाधारण पुस्तकाची उंची लक्षात घेऊन त्यापेक्षा थोडी मोठी वेणी आपल्याला घालायची आहे. वेणी 12 इंच तरी हवी. 3) वेणी कशी घालायची ते घरात कुणालाही विचारा, मोठे तुम्हाला नक्की मदत करतील. 4) वेणी निम्म्याहून अधिक झाली की तिन्ही लोकरींमधून बटण छानपैकी ओवा. बटणाचा चारही भोकांमधून लोकर गेली पाहिजे. 5) त्यानंतर खाली पुन्हा वेणी घाला आणि शेवटी घट्ट गाठ मारा म्हणजे वेणी सुटणार नाही. 6) ही वेणी तुम्ही बुकमार्कसारखी वापरू शकता.
प्रकार 2साहित्य: आईस्क्रीममधली स्टिक किंवा कुठलीही काडी, लाकडी चमचा, रंग, जाड कागद. कृती: 1) स्टिक/ काडी/ लाकडी चमचा जे काही तुमच्याकडे असेल ते स्वच्छ धुवून, पुसून घ्या. ओलेपणा आजिबात नको.2) आता त्याला तुमचा आवडता रंग लावा. त्यावर डिझाईन किंवा डुडलही तुम्ही करू शकता. 3) जाड कागदाचे तुम्हाला हवे ते आकार बनवून घ्या. गोल, त्रिकोण, चौकोन किंवा इतर कुठलाही आकार. 4) या आकारांना एकतर तुम्ही नाकडोळे काढून काटरून लूक देऊ शकता किंवा मग त्यावर छान छान कोट्स, शब्द लिहू शकता. 5) आकार वाळले की ते काडीच्या वरच्या टोकाला चिकटवा. झाला तुमचा बुकमार्क. 6) पुस्तकात ठेवताना आकार पुस्तकाच्या बाहेर ठेवा.