लहानपणी कुल्फी करण्याचे उद्योग कोणी कोणी केलेत? खरं सांगा! पहिली दुसरीत असतांना पाण्याच्या ग्लास मध्ये सरबत घालायचं, त्याच्यात चमचा घालायचा आणि ते फ्रीजर मध्ये ठेऊन द्यायचं. मग दर अध्र्या तासाने फ्रीजर उघडून आईची बोलणी खायची. - आणि शेवटी एकदाचं ग्लास मधलं सगळं सरबत गोठलं, की तो ग्लासच्या शेपचा, सरबताचा चवीचा चमच्यावर अडकलेला बर्फाचा गोळा बाहेर काढायचा आणि ‘मी आईस्क्रीम केलं’ असं म्हणून फुशारक्या मारत घाईघाईने खायचा. कारण ते खतरनाक आईस्क्रीम एकदम पटापट वितळतं. हा उद्योग ज्यांच्या घरात फ्रीज आहे त्या प्रत्येकाने केलेला असतो. ज्यांच्या घरात फ्रीज नाही त्यांनी फ्रीज असलेल्या नातेवाईकांकडे किंवा मित्र मैत्रिणींच्या घरी हा प्रयोग केलेला असतो. लहान असतांना तुम्ही इतके उद्योग करू शकत होता, तर आता खरं आईस्क्रीम पण करू शकता. सोप्प असतं ते.
दोन कप दूध घ्यायचं. त्यात चवीनुसार साखर घालायची. मग चिक्कू, स्ट्रॉबेरी, आंबा यातलं एखादं फळ मिळालं तर ते मिक्सरला फिरवून त्यात घालायचं. ते नाही मिळालं तर कोको पावडर, तीही नसेल तर कॉफी पावडर आणि अगदीच काही नाही तर थोडा सुका मेवा बारीक करून घालायचा. नुसता सुका मेवा घातला तर त्याला व्हॅनिला किंवा केशर फ्लेवर साठी घालायचं. मग हे सगळं प्रकरण ढवळत ढवळत गॅसवर गरम करायचं. घरात मक्याचं पीठ असेल तर ते घाला म्हणजे आईस्क्रीम छान घट्ट होतं. कॉर्न फ्लोअर नसेल तर दूध थोडं आटवून घ्या. ते गार होऊ द्या. आणि मग फ्रीजर मध्ये ठेवा. साधारण चार-पाच तासांनी ते सेट होत आलं, की बाहेर काढायचं आणि मिक्सरला फिरवून परत आत ठेवायचं. त्यानंतर चार तासांनी आईस्क्रीम तय्यार!फक्त यात वापरलेली सगळी भांडी आपली आपण घासून टाका नाही तर आई पुन्हा स्वयंपाकघरात येऊ देणार नाही हे लक्षात ठेवा!