तुम्हाला घरातल्या मोठ्या माणसांचा कधी राग येतो का? खूपच वेळा येत असेल ना? मोठी माणसं आपल्याला रागावतात, आपलं म्हणणं ऐकून सुद्धा घेत नाहीत, आपल्याला सारखी कामं सांगतात आणि आपण त्यांना एखादं काम सांगितलं की मात्र ‘आपली कामं आपण करावीत!’ म्हणून आपल्याला लेर मारतात, आपल्याला जे पाहिजे ते कधीच करू देत नाहीत, सारखे बोअर भाज्या खायला लावतात; मग त्यांचा राग तर येणारच!पण प्रॉब्लेम काय होतो की मोठ्या माणसांना आपला राग आला की ते आपल्याला डायरेक्ट रागवून मोकळे होतात. त्यांना फारच राग आला तर डायरेक्ट धपाटे पण घालतात. आणि आपण मात्र राग आला तरी त्यांना तसं म्हणायचं नसतं. कारण आपण त्यांना तसं म्हंटलं की ते आपल्याला अजूनच रागावतात.
‘इतकी अक्कल आली का तुला?’ ‘आता तू शिकव आम्हाला कसं वागायचं ते!’ ‘वर तोंड करून बोलू नकोस!’ असलं काहीतरी ऐकायला लागतं.पण मग आपल्याला आलेला मोठ्या माणसांचा राग मांडायचा कुठे? तर कागदावर! आपल्या खोलीत एका कार्डशीटवर घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांचं चित्र काढा. चित्र काढता येत नसेल तर त्यांची नावं लिहा. त्याच्या खाली भरपूर मोकळी जागा सोडा. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला मोठ्या माणसांचा राग येईल तेव्हा त्यांच्या नावाच्या खाली एक मजबूत फुली देऊन टाका. आणि मोठ्या माणसांची एखादी गोष्ट आवडली तर त्यांना बरोबर ची खूण द्या. म्हणजे त्यांनी आपल्याला आवडणारं काहीतरी खायला केलं, आपल्याला पाहिजे ते खेळू दिलं असं काही केलं की बरोबर ची खूण द्या. बघा तर खरं, एक आठवड्याने त्यांचं प्रगती पुस्तक कसं दिसतं ते!