आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांना नातेवाईक असतात. काही थोडी मुलं अशी असतात की त्यांना आईबाबा पण नसतात. त्यामुळे बाकीचे नातेवाईक पण नसतात. पण तरीसुद्धा त्यांना मित्र मैत्रिणी असतातच आणि ते अनेकदा भावाबहिणींसारखे जवळचे असतात. तर, आज आपण आपल्याला असलेले नातेवाईक मोजूया. त्यात तुम्हाला असलेले नातेवाईक आणि मानलेले नातेवाईक असे सगळे येतील. म्हणजे तुम्ही मानलेला दादा असेल, किंवा वडिलांची मानलेली बहीण असली तर ती तुमची मानलेली आत्या असेल, त्यांनाही आपण आपल्या नातेवाईकांमध्ये मोजू. कारण ते आपल्यासाठी नातेवाईकच असतात.तर, आपल्याला असं करायचं आहे, की -1. आपल्या कुटुंबाचा फॅमिली ट्री बनवायचा आहे. किमान तीन पिढ्या मागे जाईल, म्हणजे आजीआजोबांइतका, इतका मोठा. 2. त्यामुळे एक मोठ्ठा कागद घ्या. त्यावर आधी आई + बाबा असं लिहून त्यांच्या लग्नाची तारीख घाला. 3. आईबाबांचं नाव कागदाच्या अगदी तळाला लिहायचं. त्याच्या खाली फक्त तुम्ही आणि तुमची सक्खी भावंडं. 4. मग आईच्या शेजारी समांतर रेषेत तिचे भाऊ बहीण, वडिलांच्या बाजूला समांतर रेषेत त्यांचे भाऊबहीण. 5. मग त्या भाऊबहिणींचं ज्यांच्याशी लग्न झालेलं आहे त्यांचं नाव त्यांच्या शेजारी. 6. त्यांच्या खाली, तुमच्या समांतर रेषेत त्यांची भावंडं. म्हणजे तुमची चुलत-आत्ते-मावस-मामे भावंडं.7. मग आईबाबा पिढीच्या वर आजी आजोबा. त्यांचे भाऊ बहीण. त्यांची मुलं. हे सगळे तुमचे चुलत-काका, मावस-काका, मामे-मावशी वगैरे मंडळी. 8. त्यांची मुलं म्हणजे तुम्ही सांगता ना, आईच्या मामेबहिणीचा मुलगा आहे, अशी सगळी नाती त्यात येतील.
- हुश्श! वाचतांना दम लागला ना? पण करायला घ्या. एकदम सोप्पं आहे. आणि हे करायला तुमचे आईबाबा किती उत्साहाने मदतीला येतात त्याची गंमत बघा!