तुमच्याकडे मागच्या वर्षीच्या वह्यांमध्ये काही कोरी पानं उरली आहेत का? कसला बावळट प्रश्न आहे ना? अर्थातच कोरी पानं उरलेली आहेत. संपूर्ण वही भरून कोण अभ्यास करतं? काहीप्पण! तर तुमच्याकडे जुन्या वह्यांची कोरी पानं आहेत. घ्या ती काढून! आता दुसरा प्रश्न, तुमच्याकडे वॉटर कलर्स आहेत का उरलेले? जरा विचार करायला लागेल ना? काही रंग संपले असतील. काहींची झाकणं नीट न लावल्याने ते वाळून गेले असतील. काही रंग अगदी तळाशी उरले असतील. पण हरकत नाही. आपल्याला थोडेच रंग आणि तेही अगदी पातळ करून लागणार आहेत. आपल्याला हे जुने कोरे कागद रंगवून त्यांना फ्रेश लूक द्यायचाय. फ्रेश लुक येण्यासाठी तुम्हाला कुठले रंग द्यावेसे वाटतात? ते रंग भरपूर पातळ करून ते सगळे कागद वॉश दिल्यासारखे वेगवेगळ्या रंगाने रंगवून काढा. मग ते वाळवा.
आता आपल्याला या रंगीत कागदांच्या डाय?्या बनवायच्या आहेत. कश्या? तर आधी एका डायरीत जेवढे कागद पाहिजे असतील ते नीट कडा जुळवून लावून घ्या. मग त्यातल्या सगळ्यात वरच्या कागदावर समासाच्या बाजूला साधारण एक सेंटीमीटर आत खुणा करायच्या आहेत. कागदावर उभी पट्टी ठेवा आणि दर दोन सेंटिमीटरवर पेन्सिलीने हलकी खूण करा. सगळे कागद अगदी एका रेषेत जुळवून घ्या आणि पंच मशीनने त्या खुणांवर भोकं पाडा. घरात पंच मशीन नसेल तर दाभणाने आणि अगदीच काही नसेल तर जरा ताकद लावून बॉल पेनने भोकं पाडलीत तरी चालेल. आता घरात एखादी छान लेस किंवा सॅटिनची रिबन आहे का ते शोधा. नसेल तर साधी सुतळी सुद्धा चालेल. ही लेस किंवा सुतळी त्या सगळ्या भोकांतून ओवून घ्या. वरच्या बाजूला त्याची छान गाठ मारा. तुम्ही रंगीबेरंगी डायरी तयार आहे!