तुम्ही कधी रंग वितळवले आहेत? आता तुम्हाला प्रश्न पडेल हे काय भलतंच. रंग कोणी वितळवत का? पण तुम्हाला माहिते रंग वितळवून सुद्धा एक सुंदर चित्र तयार होऊ शकतं. कसं? चला बघूया!साहित्य: निरनिराळ्या रंगांचे क्रेयॉन्स, हातात धरता येईल अशी छोटी किसणी, पांढरा कागद, बटर पेपर जो बेकरी पदार्थ करायला वापरतात. समजा तो नसेल तर शाळेच्या वह्यांच्या कव्हर्ससाठी वापरला जाणारा प्लॅस्टिक कोटेड कागद. जुन्या वह्यांची कव्हर्स काढून वापरू शकता. तेही नसेल तर दुसरा पांढरा कोरा कागद वापरा. इस्त्री (मोठ्यांची परवानगी आणि गरज असल्यास मार्गदर्शन आवश्यक.), वर्तमानपत्र कृती :
1) वर्तमानपत्र पसरून घ्या. त्यावर पांढरा कागद ठेवा. 2) आता किसणी हातात घेऊन तुम्हाला जे जे रंग हवे आहेत ते आलटून पालटून पांढऱ्या कागदावर किसा. रंगांचा किस पांढऱ्या कागदावर पडायला हवा. 3) समजा आजूबाजूच्या वर्तमानपत्रवर सांडला तर तो उचलून कागदावर टाका. 4) इस्त्री गरम करा. रंग किसून टाकलेल्या पांढऱ्या कागदावर बटर पेपर किंवा पर्यार्यी कागद ठेवा.5) आणि कागद जळणार नाही याची काळजी घेत वरच्या बटर पेपरवरून इस्त्री फिरवा. 6) इस्त्री खूप तापवू नका. नाहीतर कागद जळेल. 7) इस्त्री फिरवताना खालचे रंग मेल्ट होऊन कागदावर पसरतील आणि आकृती तयार करतील. 8) पुरेशी इस्त्री फिरवून झाली कि इस्त्री बंद करून लांब सुरक्षित जागी ठेवा. 9) वरचा बटर पेपर किंवा कागद हलक्या हाताने काढा. 10) सुंदर पेंटिंग तयार झालेलं कागद तयार आहे. 11) या वितळलेल्या क्रेयॉन्सपासून तयार झालेल्या कागदाचा वापर तुम्ही निरनिराळी पद्धतीने करु शकता. हा कागद आतून कोराच आहे त्यामुळे त्याचा ग्रीटिंग कार्ड सारखा उपयोग होऊ शकतो. किंवा क्रेयॉन्सचा भाग वर ठेवून या कागदापासून तुम्ही इन्व्हॉलॉप्स बनवू शकता. 12) टेक्श्चर्ड् पेपर आणण्याला बाजारात जायला नको कि पैसे खर्च करायला नको. घरच्या घरी तुम्ही सुंदर नक्षीदार कागद तयार करू शकता.