आई वर्षातून एकदोन वेळा तरी जुने कपडे देऊन टाका म्हणून मागे लागते. आपल्याला आपले काही टीशर्ट कध्धीच द्यायचे नसतात. म्हणजे आपण म्हातारे झालो तरी आपल्याजवळ ते टीशर्ट हवेत असंच आपल्याला वाटत असतं. पण आईला तसं वाटत नसतं ना! झाला का लोचा. मग आपण एक आयडिया करूया, जुन्या टीशर्टचा रिमेक करूया, म्हणजे आई ते लगेच देऊन टाक म्हणणार नाही. साहित्य: जुना लाडका टीशर्ट, कात्री, फॅब्रिक कलर्स असतील तर ते. नसतील तर रंगकाम लॉक डाऊन संपून बाहेर पडण्याची परवानगी मिळाल्यानंतर. कृती: 1) तुमचा जुना लाडका टीशर्ट व्यवस्थित स्वच्छ धुवून, उन्हात वाळवून घ्या. 2) त्याला हलकीशी इस्त्री करा. कारण खूप चुण्या असतील तर रिमेक नीट होणार नाही. हे काम करायला आईबाबांची किंवा घरातल्या मोठ्या माणसाची मदत घ्या. 3) आता टीशर्टच्या खालच्या बाजूने 2 इंचांच्या अंतरावर दीड इंच उभी रेष मारून घ्या. त्यासाठी पेन्सिल किंवा पेन वापरा. संपूर्ण खालच्या बाजूने हे करा. 4) आता या दीड इंच उभ्या रेषेवर आपल्याला कापायचं आहे. त्यासाठी टीशर्टची पुढची आणि मागची बाजू एकत्र धरून कापा. म्हणजे दोन्ही बाजूने सारखे कापले जाईल.
5) आता समोरच्या बाजूच्या पहिल्या दोन कापलेल्या बाजूंची गाठ मारा. टीशर्टच्या पुढच्या मागच्या कापलेल्या ठिकाणी अशा गाठी मारा. गाठी चांगल्या पक्क्या मारा. 6) खालून तुमचा टीशर्ट एकदम डिझायनर झाला आहे. 7) जर घरात फॅब्रिक पेंट असेल तर ती शर्टवर तुम्हाला हवं ते रंगवा. 8) वाळू द्या. तुमचा टीशर्ट रिमेक होऊन परत घालायला तयार आहे.
9) घरात रंग नसेल तर रंगासाठी तुम्ही हट्ट करणार नाही हे माहित आहे. 10) लॉक डाऊन संपे पयर्ंत थांबा. सगळं नेहमीसारखं सुरळीत सुरु झालं की टीशर्ट रंगवा. किंवा रंगवूच नका. नुसत्या गाठी मारलेला टीशर्टही भारी दिसतो.