आपल्याकडे काही कपडे असे असतात जे आपल्याला कधीच टाकून द्यायचे नसतात. म्हणजे कधीच नाही. म्हणजे मोठं झाल्यावर पण नाही. कारण ते कपडे इतके कम्फर्टेबल असतात, की त्यात अजिबात उकडत नाही. किंवा त्यातला एखादा टी शर्ट आपल्याला लकी असतो. किंवा एखादा स्कर्ट आपल्या लाडक्या मामा किंवा मावशीने पहिल्या पगारातून आणलेला असतो, आणि आपण ऑलरेडी दोन वेळा त्याची उंची वाढवलेली असते. पण आता तो स्कर्ट पूर्ण विटलेला असतो किंवा आपल्या टीशर्टचा पुढचा भाग भुरकट झालेला असतो. ‘आता ते कपडे टाकून दे नाही तर मी फरशी पुसायला घेईन’ अशी धमकी आईने दोन वेळा देऊन झालेली असते. पण तरी आपल्याला ते कपडे टाकून द्यायचेच नसतात. अशा वेळी ते कपडे वाचवायचे कसे?तर रंगवून किंवा त्यावर पॅचवर्क करून!म्हणजे कसं?
तर त्या टीशर्ट वर चक्क एखादं मस्त चित्र काढायचं. किंवा एखादं भारी वाक्य लिहायचं. आणि मग ते मस्त रंगवून टाकायचं. मस्त फ्रेश कलर्स घ्यायचे. किंवा रंगीत कलर्स घ्यायचे. जमलं तर पर्ल कलर्स किंवा स्पार्कल्स घ्यायचे. कपड्यावरचे रंग वेगळे मिळतात. पण ते ऑलमोस्ट सगळ्या मोठ्या स्टेशनरीच्या दुकानात मिळतात. आणि समजा रंग नसतील तर? तर एखाद्या दुस?्या जुन्या फ्रेश कापडातून आपल्याला पाहिजे ते आकार कापायचे, आणि त्याच्या कडा दुमडून ते शिवून टाकायचे. यात फुलं, हार्ट्स, चांदण्या, ढग असे आकार करणं त्यामानाने पुष्कळच सोपं असतं. आणि अशी सोपी सोपी चित्र एकमेकांना जोडून त्यातून एक छान चित्र बनवणं पण सोपं असतं. म्हणजे हार्ट्सचं झाड, किंवा चांदण्याचा पाऊस किंवा असं काहीही.. तुमचा टीशर्ट किंवा स्कर्ट एकदम नवीन होऊन जाईल..