तुम्हाला इतके दिवस सुट्टी आहे हे घरातल्या मोठ्या माणसांच्या एव्हाना डोळ्यावर यायला लागलंच असेल. त्यात आता हळू हळू सुट्टी लागताना शाळेने दिलेला अभ्यासही संपला असेल. आणि मग संपूर्ण दिवस तुम्ही नुसते इकडे तिकडे उनाडक्या करणार हे लक्षात येऊन मोठी माणसं आधीच प्लॅनिंगला लागली असतील. काहीही करून तुमच्या डोळ्यांसमोर दिवसातले दोन तास तरी पुस्तक असलं पाहिजे या ध्येयाने ते आता पछाडले जातील. आणि मग, तुमचं वाचन वाढावं म्हणून ते कामाला लागतील आणि लॉकडाऊन असतांना सुद्धा काहीतरी आयडिया करून लहान मुलांच्या पुस्तकांचा ढीग तुमच्यासमोर आणून ठेवतील आणि ‘ही सगळी पुस्तकं वाचायची आहेत’ असा आदेश काढतील. आता हा लेख वाचणारी मोठी माणसं म्हणतील की यात आमचं काय चुकलं? आम्ही तर मुलांच्या भल्यासाठीच हे करतोय.
तर त्यांचं काही चुकलेलं नाहीये. ते तुमच्या भल्यासाठीच सांगतात. मुलांनी पुस्तकं वाचलीच पाहिजेत. पण यात काय गोंधळ होऊ शकतो माहितीये का? मोठी माणसं ना, त्यांच्या लहानपणी त्यांना आवडणारी पुस्तकं तुम्हाला आणून देतील. त्यातली काही चांगली असतीलही. पण खरं सांगू? मोठ्या माणसांनी त्यांच्या चॉइसने आणलेली पुस्तकं बोअर निघण्याचा फार मोठा धोका असतो.मग अशा वेळी काय करायचं? तर मोठ्या माणसांनी यादी करण्याच्या आधी आपणच आपल्याला जी पुस्तकं वाचायची आहेत त्यांची यादी करायला घ्यायची. आणि ती मोठ्या माणसांच्या हातात ठेवायची. यामुळे काय होईल? तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं इम्प्रेशन चांगलं पडेल. आपलं मूल आपणहून पुस्तकं वाचायला मागतंय हे बघून आईवडील तुमचं कौतुक करतील. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला चांगली, तुमच्या चॉईसची पुस्तकं वाचायला मिळतील. मग आता घ्या करायला यादीमी सुरुवात करून देऊ का?1. हॅरी पॉटर (मराठी चालेल, पण इंग्लिश वाचलंत तर जास्त चांगलं. त्यातलं इंग्लिश सोपं आहे.)2. पाडस (ही एका तुमच्याच वयाच्या मुलाची आणि त्याचं मित्र झालेल्या हरणाच्या पिल्लाची गोष्ट आहे.)3. ब्लॅक ब्यूटी (ही एका घोड्याच्या आयुष्याची गोष्ट आहे)