- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागसाहित्य : 250 मिली दूध, वेगवेगळया उंचीची आणि व्यासाची पातेली.कृती :लक्ष नसले कि दूध उतू जाते. तुम्हाला निरीक्षण करायचं आहे की दूध गरम करताना काय घडते? दुधावर प्रथम सायीचा थर तयार होतो व तो काही वेळाने फुगून वर यायला लागतो. नंतर तो थर भांडयाच्या बाहेर पडतो म्हणजेच दूध उतू जाते. दूध तापवले तरी उतू जाणार नाही असे पातेले आपल्याला शोधून काढायचे आहे. 200 मिली दूध 200 मिलीच्या पातेल्यात गरम केले तर ते उकळायला लागण्यापूर्वीच उतू जाणार. त्यासाठी दुधाच्या सव्वा पट 250 मिलीचे पातेले घ्या. त्यात दूध तापवायला ठेवा. उतू जाते का? उतू जात असेल तर दिडपट म्हणजे 300 मिली आकारमानाचे पातेले घेऊन प्रयोग करा. मग पावणोदोन पट 350 मिली, दोन पट 400 मिली, सव्वा दोन पट 450 मिली अशी पातेली घेऊन प्रयोग करा.
किती पट मोठ्या आकारमानाच्या पातेल्यात कितीही उकळले तरी दूध उतू जात नाही? याचा शोध घ्यायचा आहे.ते आकारमान सापडले की त्याच आकारमानाची पण विविध व्यास असणारी पातेली घेऊन हाच प्रयोग करा. पातेल्याची उंची आणि त्यातल्या दुधाची पातळी कोणत्या प्रमाणात असली तर दूध उतू जात नाही? हे शोधून पाहा..