- गौरी पटवर्धन
सुट्टीचा सगळ्यात मोठा वैताग काय असतो? तर आपण घरात खेळलो तर आईबाबा म्हणतात बाहेर खेळा, बाहेर खेळलो की शेजारचे म्हणतात घरात खेळा. त्यात आत्ता तर बाहेर खेळायची काही सोयच नाहीये. त्यामुळे आपण सारखे घरात खेळतो. मग आईबाबा म्हणतात की सारखा काय खेळ? घरात काहीतरी मदत करा. इतका / इतकी लहान आहेस का तू आता? म्हणजे आपण काहीतरी सजेशन द्यायला गेलो की हे लोक म्हणतात की ‘मोठ्यांच्या मध्ये लहान मुलांनी बोलायचं नाही!’ आणि कामं करायच्या वेळी मात्र आपण मोठे?? भाई वा!एनी वे, ते जाऊदे. घरातली कामं करायलाच लागणार असतील तर ती निदान आपल्या सोयीने करता येतील का ते तरी बघू ना. त्यामुळे सगळ्यात आधी, सगळ्यात महत्वाचं! घरातली कामं करायला नाही म्हणायचं नाही. नाहीतर आईबाबा लोक आपल्याला कुठलीतरी भंगार कामं चिकटवतात. त्यापेक्षा आपण ‘हो’ म्हणायचं आणि आपल्याला पाहिजे ते काम मागून घ्यायचं. पण असं कुठलं काम असतं जे आपल्याला करावंसं वाटेल? तर कपड्यांच्या घड्या करायच्या आणि कपड्यांना इस्त्री करायची.
कपड्यांच्या घड्या करायला दहा मिनिटं सुद्धा लागत नाहीत, पण आपण एक संपूर्ण काम केल्यासारखं दिसतं. म्हणून ते काम मागून घ्यायचं. आणि त्यातून सगळ्यांचे इस्त्रीचे कपडे वेगळे काढायचे. मस्त गाणी लावायची आणि कपड्यांना इस्त्री करून द्यायची.इस्त्री करायला बराच वेळ लागतो. मग आपण ते काम करायचं? तर जरा विचार करा. एरवी या कपड्यांना इस्त्री कोण करतं? तर ब?्याच ठिकाणी इस्त्रीवाला येऊन कपडे घेऊन जातो, किंवा आपल्यालाच गाठोडं नेऊन टाकायचं आणि घेऊन यायचं काम करायला लागतं. आता विचार करा, इस्त्रीवाला एका कपड्याला इस्त्री करायचे किती पैसे घेतो??? तेवढे पैसे थेट आपल्या पिगी बँकेत जमा करायचे, आलं लक्षात???