घरात बसून बसून जाम बोअर झालंय हे ठाऊक आहे पण आता करणार काय? एक काम करूया आज जरा वेगळं काहीतरी ट्राय करूया. पानं, रंग आणि लाटण्याचा वापर करून काही करता येईल का? चला, बघूया!साहित्य: कुठल्याही झाडाची कुठलीही पाच पानं. निरनिराळी झाडं नसतील तर एकाच झाडाचीही चालतील. (झाड शोधण्यासाठी घराबाहेर पडायचं नाही.) कुठलेही आवडते पाच रंग, पांढरा कागद, लाटणं .
कृती: 1) पानांना मागच्या बाजूने रंग लावा. 2) रंग ओला असतानाच रंगाच्या बाजूने पान पांढऱ्या कागदावर ठेवा. 3) आता त्यावर लाटणं ठेवून पोळ्या लाटतात तसं हळूहळू लाटणं पानावरुन फिरवा. 4) हे करताना काळजी घ्या. लाटणं जोरजोरात फिरवलंत तर पान हलेल आणि ठसा नीट येणार नाही. 5) पुरेसा दाब लाटण्याने पडलाय असं वाटल्यावर लाटणट हळूच बाजूला करा आणि पण हलक्या हाताने काढून घ्या. 6) अशा पद्धतीने कागदावर हवे तेवढे पानांचे ठसे काढून घ्या. झालं तुमचं सुंदर चित्र तयार.