मुलींना घरातली कामं करता येतात. मुलग्यांना मात्र येत नाहीत. माझा भाऊ आठवीत आहे, पण त्याला चहा सुद्धा करता येत नाही. असं का?- सायली, जळगाव
अतिशय महत्वाचा आणि अतिशय अवघड प्रश्न विचारला आहेस. तुला ज्या अर्थी हा प्रश्न पडतोय त्याअर्थी आता जे सांगणार आहे ते तू समजून घेऊ शकशील. आपला समजा स्त्री पुरुष समानता न मानणारा आहे. म्हणजे, स्त्री आणि पुरुषांना समान वागणूक देणारा, समान हक्क देणारा नाही. आणि ही असमानता घरातून सुरु होते. मुलींसाठी गुलाबी रंग, मुलांसाठी निळा रंग इथपासून सुरु होते. त्यात स्वयंपाकघर हे फक्त बायकांचंच क्षेत्र मानल्यामुळे आणखीनच गोंधळ वाढला आहे. पूर्वी म्हणजे साठ सत्तर वर्षांपूर्वी पयर्ंत बायका आजच्या इतक्या बाहेर काम करायला जात नसतं. त्यांनी घरकाम करावं अशीच सगळ्यांची अपेक्षा असायची. त्यामुळे मुलींना सगळं यायला हवं असं मानून स्वयंपाक आणि घरकाम शिकवलं जायचं. मुलांनी हे करायचं नाही हे गृहीत असल्याने मुलांना घरकामातलं काहीच शिकवलं जायचं नाही.
पण काळ बदलला तसं बायका घराबाहेर पडल्या. नोक?्या करू लागल्या. उच्च पदांवर काम करू लागल्या. पण त्या जशा घराबाहेर पडल्या तसे घरातल्या पुरुषांनी मात्र घरकामात लक्ष घातलं नाही. तशी त्यांच्याकडून स्त्रियांनीही अपेक्षा केली नाही. त्यामुळे समाजाचं चित्र बदललं तरी घरकामात पुरुषांचा सहभाग वाढला नाही. आजही अनेक घरांतून मुलग्यांनी घरकाम करायचं नाही असं मानलं जातं त्यामुळे त्यांना चहा करणं, कुकर लावणं, केर काढणं, भांडी धुणं या अगदी बारीक सारीक घरकामाचा गोष्टी येत नाहीत. पण हे चित्र आता बदलायला हवं. तू याची सुरुवात करू शकतेस. आईला सांग भावालाही घरकाम शिकवायला. कदाचित ती सुरुवातीला नाही म्हणोल, रागवेल पण प्रेमाने दोनचारदा सांगितलंस तर ऐकेल. तिला ऊर्जा वाचायला सांग. भावालाही वाचायला सांग म्हणजे त्यालाही घरकामाचं महत्व समजेल आणि तो स्वत:हून कदाचित करायला लागेल.