- रणजितसिंह डिसले, परितेवाडी शाळा तुम्ही कधी, कासवांचे हॉस्पिटल पाहिलंय का? काहीजण म्हणतील इथे माणसांना पुरेशी हॉस्पिटल नाहीये, तर कासवांचे हॉस्पिटल कुठून आणणार? पण जेंव्हा असे समुद्री प्राणी जखमी होतात, त्याच्यावर उपचार कोण करणार? आपल्या घरातील पाळीव प्राणी आजारी पडले तर आपण त्यांना लगेच डॉक्टरकडे घेवून जातो. पण या जीवांकडे कोण लक्ष देणार? आमच्या शाळेत आम्ही जेंव्हा सागरी जलजीवन हा घटक अभ्यासत होतो तेंव्हा एकाने विचारले कि सर, हे समुद्रातील प्राणी आजारी पडत नाहीत का? आणि पडले तर त्याच्यावर कोण उपचार करतं? या प्रश्नांचे उत्तर नव्हते, म्हणून मी शोध घेवून उत्तर देतो असे सांगितले. शोध घेत असताना मला अमेरिकेतील फ्लोरिडा ओशिनोग्राफी सोसायटीच्या वतीने चालवण्यात येणा?्या कासवांच्या हॉस्पिटल बद्दल माहिती मिळाली. माझा शोध तर योग्य दिशेने होता, पण यांच्याशी कनेक्ट होण्यात प्रमाणवेळेची अडचण होती.आपल्यापेक्षा साडे नऊ तास ते मागे असल्याने शाळेच्या वेळेत आम्हांला ते पाहता येणार नव्हते.
मग आम्ही एकेदिवशी सायंकाळी 6 वाजता शाळेत यायचे ठरवले. आणि मग काय, आमच्या स्क्रीनवर त्या हॉस्पिटलमधील कासवे दिसू लागली. तिथे अनेक कासवांवर कशाप्रकारे उपचार केले जातात, ते मुलांना सांगितले गेले. तिथल्या डॉक्टरांनी हाक मारली कि अनेक कासवे त्यांच्याकडे यायची, जशी आपल्या घरातील मनीमाऊ येते न अगदी तशीच. तिथे कायम स्वरूपी अपंगत्व आलेल्या कासवांसाठी विशेष कक्ष आहेत. जे बरे होतात त्यांना परत समुद्रात सोडले जाते. मुक्या प्राण्याविषयीची भूतदया त्यादिवशी मुलांनी अनुभवली.