- अनन्या भारद्वाज
पळून जावंसं वाटतंय. वैताग वैताग झालाय. बाई असणंच पाप आहे या काळात असं वाटतं ना तुम्हाला कधीतरी? वाटतच असणार. मला तर फार वाटलं या लॉकडाऊनच्या 8क् दिवसात! जीवाचा नुसता चि-व-डा झाला अनेकदा. जीव रडकुंडीला येणो वैगरे वाक्प्रचार समजले.तर असो, हे जुनंच नॉर्मल आहे.
आता नवीन नॉर्मलची कथा ऐका.त्यातही काही नवीन नाही, कुणाही नोकरदार आईची आणि बाईची हीच कथा. ( नोकरदारच कशाला, गृहिणी असलेल्या माङया मैत्रिणींचेही हाल काही कमी नाहीतच म्हणा!)तर झालं असं की, कोरोनाकृपेनं वर्क फ्रॉम होम सुरु झालं, घरची भांडी घासा आणि ऑफिसची कामंही उपसा असं ‘न्यू नॉर्मल’ सुरु झालं. म्हणता म्हणता, सगळीकडेच पे कट, जॉब लॉसच्या चर्चाही काळजाचं पाणी पाणी करायला लागल्या. आता नोकरी करायची तर काहीतरी इनोव्हेटिव्ह करा, काहीतरी असं काम करा की कंपनीला तुमची गरज वाटली पाहिजे, असा गजर सुरु झाला.त्या गजरात जाऊन चार टाळ आपणही पिटावे तर इकडे सगळी माणसं घरात! नवरा घरात, मुलं घरात, घरकाम सगळं घरात!!..चहा-नाश्ता-जेवण-झाडू-फरशी-भांडी हे चक्रही गोलगोल घरातच.त्यात सोशल मीडीयातले ते विविध-पदार्थदर्शन सोहळे, मुलांसह आम्ही काय काय करत ‘क्वालिटी टाइम’ घालवला म्हणून आनंदाचे उमाळे. ‘तिथंही आपण कमीच पडतो’ असा गिल्ट आतआत मुरायला लागलाच. सगळ्याच थडींवर उभं राहत जे जसं जमेल तेवढं केलं, निभावलं. पण तरीही एकुण सगळं जगणंच वेगाने बदलायला लागलं. ऑफिसच्या झूम मिटिंगा, वेबिनार,ऑनलाइन टीम मोटिव्हेशन असं सगळं रंगात आलं. इथंच कहाणीत एक नवीन ट्विस्ट आला.तर झालं असं, अगदी परवाची गोष्ट! बॉसचा मेसेज आला की, शुक्रवारी सकाळी 10 वाजता, सी यू ऑल, लेट्स टॉक समथिंग लाइफ चेंजिग!हे सारं न्यू नॉर्मलचा भाग असल्याने व्हॉट्सऐपवर समर्थनाचा अंगठा धाडून दिला.त्याच दिवशी सायंकाळी मुलाच्या शाळेकडून मेसेज आला की, शुक्रवारी दहा वाजता पालकांचं ऑनलाइन ओरिएंटेशन. शाळा ऑनलाइन सुरु होणार आहे.आता काय करणार? काय बुडवावं ? बॉसला तर काही सांगूच शकत नाही.मग मुलालाच सांगितलं की, बाबा रे तुङया शाळेचं ओरिएंटेशन आहे पण मला नाही जमणार; बाबाला सांगू!पण तेवढय़ात बाबा म्हणाला, मला उद्यापासून ऑफिसला जायचंय! मला धरु नका आता तुमच्यात.झाला ना वैताग?चि-ड-चि-ड झाली. क-ल-क-ला-ट नुस्ता.अशावेळेच अशी चिडचिड होते की कुणाचं डोकं फोडावं की दुस:याचं की आपलं? पण असे अहिंसक विचार लगेच पुसून टाकत स्वत:लाच सांगितलं,बाई गं, हेच न्यू नॉर्मल आहे.मुलगा ऑनलाइन शिकणार आहे आणि तू वर्क फ्रॉम होम आहेस!होऊ द्या आता पुनश्च हरिओम. ( मग पुढे काय झालं? -लक बाय चान्स. बॉसच्या बॉसने त्याचवेळी त्यांची झूम मिटिंग लावली त्यामुळे आमची मिटिंग नेमकी रद्द झाली, आणि मी शाळेच्या संचालकांनी होस्ट केलेल्या झूम मिटिंगला हाताची घडी तोंडावर बोट असं न करता, फक्त झूमचा व्हाइस म्यूट करुन बसले.)
(लेखिका पत्रकार आणि 7 वर्षाच्या मुलाची आई आहे )