ऍड. वैशाली भागवत, प्रसिद्ध सायबर लॉ तज्ञ
मुलं सायबर स्पेसमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. दरवेळी तांत्रिक असतात असं नाही. काहीवेळा त्या मनोसामाजिकही असू शकतात. कुणी त्यांना ट्रोल करू शकतं, बुली करु शकतं, विचित्र कमेंट्स मिळू शकतात, कुणी त्यांना ब्लॅकमेल करू शकतं. त्यांच्या संपर्कात कोण आहे हे अनेकदा पालकांना माहित नसतं. मुलांना सायबर स्पेसमधल्या धोक्यांपासून वाचवायचं असेल तर सोबत दिलेल्या सात गोष्टींकडे पालकांनी गंभीरपणो बघायला हवं.या गोष्टी लक्षात आल्यानंतर पालकांच्या आणि शिक्षकांच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजलीच पाहिजे. या सात ही गोष्टी लक्षात ठेवा. असं काही तुमचं मूल वागताना दिसलं तर आरडाओरडा ना करता मुलाला/मुलीला विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोला. संवाद साधा. त्यांना ऑनलाईन वावरातले धोके समजावून द्या. संवादाइतकं प्रभावी माध्यम दुसरं कुठलंही नसतं हे लक्षात ठेवा.
1) मूल सतत ऑनलाईन असेल तर ही गोष्ट नक्कीच धोकादायक आहे. सतत ऑनलाईन जाण्याविषयी हट्ट धरत असेल तर ही धोक्याची सूचना आहे. 2) निरनिराळ्या चॅट रूम्समध्ये मोठ्यांच्या देखरेखीशिवाय मूल जात असेल आणि अनोळखी लोकांशी संपर्क करत असेल तर ही धोक्याची सूचना आहे. 3) अनोळखी माणसांचे किंवा पोर्नोग्राफी फोटो, व्हिडीओ मूल डाउनलोड करत असेल तर पालकांनी अलर्ट व्हायलाच हवं. 4) अनोळखी माणसांचे फोन येत असतील, गिफ्ट्स येत असतील, मुलांच्या बँकेत अनोळखी खात्यातून पैसे जमा होत असतील तर हा रेड अलर्ट आहे. 5) कुणाचा तरी पासवर्ड वापरून तुमचं मूल अकाउंट वापरत असेल तर मुलांशी बोलणं गरजेचं आहे कारण यातून मुलं धोक्यात येऊ शकतात. 6) वागण्यातल्या बदलांकडे लक्ष ठेवा. ऑनलाईन गेल्यावर काय काय करतात याबाबत मूल काहीच शेअरिंग करत नसेल तर काहीतरी गडबड आहे. 7) मोठी माणसं आसपास आल्यावर पटकन कम्प्युटर बंद करणं, फोन बंद करणं यासारख्या गोष्टी मुलं करत असतील तर पालकांनी अलर्ट व्हायला हवं आणि शांतपणो संवाद साधायला हवा. (शब्दांकन: मुक्ता चैतन्य )