- रणजितसिंह डिसले, प्राथमिक शिक्षक, परितेवाडी शाळा ऑनलाईन शाळेत काय काय घडामोडी घडतात? हे आपण समजून घेत आहोत. पण आमच्या परितेवाडीच्या शाळेत आम्ही असं लगेच ऑनलाईन जगात गेलो नाही. आम्ही असं लगेच इतर देशांतील मुलांशी कनेक्ट झालो नव्हतो. आमच्या शाळेतील मुल काहीशी लाजरी होती. लगेच बोलत नव्हती. मग हळूहळू त्यांना बोलत करत, त्याच्याशी मैत्री करत मी पुढे जात राहिलो. आमच्या मुलांना कविता फार आवडतात. आणि माझा आवाज काही तितकासा चांगला नाहीये. मग मी काय केलं दुस?्या शाळेतील शिक्षक ज्यांचा आवाज गोड आहे, जे कवितांना छान चाली लावतात त्यांच्या आवाजात कविता रेकॉर्ड करायचो आणि मग ते रेकॉडिर्ंग मी मुलांना ऐकवत असे. मग त्या सरांचा आवाज ऐकून मुले म्हणाली कि, सर तुम्ही त्या सरांना आपल्या शाळेत बोलवा नं! मग मी एके दिवशी त्या सरांना व्हिडिओ कॉल केला आणि ते सर आमच्या शाळेत व्हच्यरुअली आले. त्या सरांशी मुलांनी खूप गप्पा मारल्या. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या कविता म्हटल्या, आमच्या सरांचा आवाज तुमच्या सारखा का नाही? असाही प्रश्न त्यांनी विचारला. ही मुलं पहिल्यांदाच एका अनोळखी व्यक्तीशी इतका वेळ गप्पा मारत होती. मला असं वाटलं कि एक शिक्षक म्हणून मी सर्वच घटक चांगल्या पद्धतीने शिकवू शकणार नसेल तर मग मी इतर शिक्षकांची मदत घ्यायला हवी. आणि अशाच उपक्रमशील शिक्षकांचा शोध ऑनलाईन शाळेत सुरु झाला. आणि हा शोध घेत आम्ही परदेशी सुद्धा जाऊ लागलो, अर्थात व्हच्यरुअली.