ऑनलाइन शाळा आता सर्वत्र सुरु झाल्या. त्यात शिक्षकांना मुख्यत्वे काही शंका आहेत, एक प्रकारची धास्ती आहे, धाकधुक आहे की, नक्की आपण जे करतोय ते मुलांना कळत असेल का? आपले प्रयत्न पुरेसे आहेत का? इंटरेस्टिंग आहेत का? अजून काय करायला हवं? काही शंका आणि प्रश्न बहुतांश सर्वानाच पडलेले दिसतात. काहींना जुन्या शिकवण्यातल्या सुंदर गोष्टी आठवतात आणि ती मजा या तांत्रिक जोडणीत नाही असंही त्यांना वाटतं. * एक म्हणजे बहुतांश शिक्षकांना वाटतं की, मुलांसोबतचा दंगा, मस्ती, त्यातला उत्स्फुर्तपणा, जिवंतपणा आता ऑनलाइन शिकवण्यात नाही. शाळेतले ते दिवस, तो किलबिलाट, ती ऊर्जा अनेक शिक्षकांना कातर कातर करतेय.* आपण पूर्वी जसं शिकवत होतो ते आणि आता जसं शिकवावं लागतं ते, ही नव्यानं शिकवण्याची नवी रीत शिकत असतानाच शिकवणं, यात शिकवण्यापेक्षा शिकण्याचंच टेंशन अनेकांना आलेलं आहे.* अनेकांना अजून नीट वेळेचं नियोजन जमत नाही. घरकाम, शाळा, शाळेची तयारी, पीपीटी, व्हिडीओ काढणं, लिंक पाठवणं, शूट करणं, ऑनलाइन असाइनमेण्ट तपासणं यात दिवस सरतो पण काम संपत नाही. दिवस पुरत नाही. त्यामुळे टाइम मॅनेजमेण्टचा काटा चुकलेला आहे.* अनेकांना वाटतं की हे ऑनलाइन इंटरॅक्शन अतिशय कोरडं कोरडं होतंय, त्यात काही जान नाही.* काहीजण म्हणतात की आपण जे शिकवतोय ते मुलांना कळतंय की नाही हेच कळत नाही.* काहीजणांना असंही वाटतं की या ऑनलाइन शिकण्यातलं नाविन्य संपलं की मुलांचाही असं शिकण्यातला रस उडून जाईल. त्यांना ऑनलाइन बसवून ठेवण्यासाठी सतत प्रेरणा दद्यावी लागेल.* काहीजणांच्या मते ऑनलाइन शिकवण्यासाठीच्या अनेक गोष्टी माहिती, व्हिडीओ ऑनलाइन आहेत, पण त्यातलं नेमकं कोणतं आपल्या कामाचं हेच कळत नाही.* ऑनलाइन मोफत असलेल्या गोष्टीतून नेमकं काय आणि कसं निवडावं हे ठरवण्यातच अनेकांचा वेळ जातो आहे.-असे अनेक प्रश्न शिक्षकांना पडले आहेत. जे रास्त आहेत. नव्यात जीव रमत नाही असं अनेकांना वाटूच शकतं.मात्र त्यासाठी काही गोष्टी करुन पाहता येतील.
त्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे आताचे प्रश्न सगळे एकदम सुटणार नाहीत. त्यांचा प्राधान्यक्रम ठरवा. उत्तर शोधा. मुख्य म्हणजे माहिती शोधू नका. डोण्ट गो फॉर द इन्फॉर्मेशन, गो फॉर द सोल्यूशन.आता ऑनलाइन शिकवायचं आहे तर आहे, त्यामुळे वास्तव मान्य करणं आणि तोडगे शोधणं या दिशेनं आपली नजर वळवली.तर उत्तर सापडतील.ती शोधण्यासाठीची काही सूत्रं. उद्याच्या अंकात.
( संदर्भ :ब्रिटिश कौन्सिल डॉट ओआरजी)