तुम्ही एखादा छंद जोपासलेला आहे का?कुणाला दगड गोळा करायला आवडतं. कुणाला स्टॅम्प्स तर कुणाला पक्षांची पिसं. छंद आपल्याला आनंद देतो हो कि नाही, पण कधी तुम्ही शब्द गोळा करणा?्या मुलाची गोष्ट ऐकली किंवा वाचली आहे का? मिशेल आणि बराक ओबामा यांनी नुकतीच एक भन्नाट गोष्ट मुलांना वाचून दाखवली आहे. ही गोष्ट आहे जेरोमी नावाच्या मुलाची. त्याला शब्द गोळा करायला आवडायचे. वेगवेगळ्या प्रकारचे शब्द, वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारता येणारे शब्द, ओळखीचे शब्द आणि अनोळखी शब्द. तर या हा जेरोमी शब्द कसे गोळा करतो आणि त्या शब्दांच्या कलेक्शनचं पुढे तो काय करतो याची गोष्ट आहे द वर्ड कलेक्टर आणि गोष्टीचे लेखक आहे, पीटर रेनॉल्ड्स. गोष्ट तर भन्नाट आहेच पण मिशेल आणि बराक ओबामा यांनी ती इतक्या सुंदर पद्धतीने वाचून दाखवली आहे की तुम्हाला तर आवडेलच पण तुमच्या आईबाबांनाही मजा येईल. मग घरातल्या सगळ्यांनी एकत्र बसा आणि अमेरिकेचे पूर्वाध्यक्ष बराक आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी सांगितलेली गोष्ट ऐका. त्यासाठी तुम्ही युट्युबवर Storytime with President and Mrs. Obama असा सर्च करा. त्याचबरोबर मिशेल ओबामा दर सोमवारी मुलांना गोष्टी वाचून दाखवतात. त्याही तुम्ही ऐकू, बघू शकता. मिशेल ओबामा रीड अलोंग मंडे विथ मिशेल ओबामा असा वेगळा विभाग या चॅनलवर आहे त्यावर तुम्ही कितीतरी गोष्टी बघू शकता. त्यासाठी युट्युबवर जा आणि सर्च करा: READ ALONG with Michelle Obama