- रणजितसिंह डिसले , प्राथमिक शिक्षक, परीतेवाडी शाळाआपण रोजच टीव्हीवरील मालिका, काटरून्स पाहत असतो. आज बहुतांश जणांच्या घरी टीव्ही आहे. पण तुम्हांला माहितीय का, याच टीव्ही च्या माध्यमातून व्हिएतनाम मध्ये मुलांची ऑनलाईन शाळा भरते. व्हिएतनाम हा आपल्या आशिया खंडातील एक छोटासा देश आहे. देश जरी चिमुकला असला तरी इथले लोक मात्र फार कष्टाळू आहेत. आपल्याकडे कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी तिकडे मात्र शाळा सुरु आहेत. आन्ह फुंग हा नावाची एक शिक्षिका आणि तिचे टीव्ही वरील ऑनलाईन क्लास प्रचंड लोकप्रिय आहेत. आपल्या सारखाच तिकडेही घराघरात टीव्ही पोहचला आहे. आठवड्यातून 2 दिवस ती इंग्रजीचा क्लास घेते. त्या देशातील मुलानाही आपल्यासारखीच इंग्रजीची भीती वाटते.पण ही शिक्षिका ज्या पद्धतीने शिकवते, त्यामुळे अनेकांच्या मनातून इंग्रजीची भीती गेलीय. जो घटक शिकवायचा आहे त्याचे नाट्यीकरण ती करते. यासाठीचे कलाकार तिच्या गावातील किंवा इतर देशातील तिचे शिक्षक मित्र असतात. त्या त्या कलाकारांना ती संवाद लिखित स्वरुपात पाठवते आणि व्हिडिओ कसा हवाय ते सांगते. त्यांनी पाठवलेल्या व्हिडिओ मध्ये मग ती काही बदल करते आणि टीव्हीवरील तिच्या कार्यक्रमात दाखवते. टीव्ही च्या माध्यमातून सुद्धा किती चांगल्या पद्धतीने शिकवता येत हे तिने दाखवून दिल आहे. म्हणजे बघा टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा ऑनलाईन शाळा भरवता येते. मग तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगाल का, असे टीव्ही च्या माध्यमातून तुमचे ही ऑनलाईन वर्ग घ्यायला?