- गौरी पटवर्धन
तुम्हाला भारी टाइमपास सांगू का एक? भारी आयडिया आहे. म्हणजे आपला वेळ मस्त जाईल, आपला फायदा होईल, शिवाय आई-बाबांना असं वाटेल की तुम्ही त्यांना मदत करताय. घरातलं काम करताय. सांगू?
तर, सगळ्यात आधी, हे पान आई-बाबांना दिसणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर आपला प्लॅन त्यांनाही समजेल. आता, तुमच्या घरात माळा आहे का? असेल तर त्यावर चढून बघा. त्यावर प्रचंड प्रमाणात जुनं, वापरात नसलेलं सामान ठेवलेलं तुम्हाला दिसेल.
असंच सामान पलंगाच्या खाली आणि लोखंडी कपाटाच्या वर ठेवलेलंही तुम्हाला दिसेल. आता काय करायचं? तर या सामानाचं सॉर्टिंग करायचं. त्यात काही वस्तू कामाच्या असतात, काही आई-बाबांना नको म्हणून त्यांनी ठवून दिलेल्या असतात; पण आपल्या कामाच्या असतात. आणि काही वस्तू मात्र खरोखर एकदम भंगार असतात.
तर सगळ्या वस्तू या तीन ढिगांमध्ये वेगवेगळ्या करायच्या. त्यातल्या ज्या वस्तू कामाच्या आहेत; पण वर टाकून दिल्यामुळे बाजूला पडल्या आहेत त्या स्वच्छ करा. त्या आई-बाबांना द्या. त्यातल्या ज्या वस्तू तुम्हाला स्वत:साठी पाहिजे आहेत त्या काढून घ्या. आणि मग उरलेलं भंगार एका पोत्यात भरा.
इतका वेळ आपण मेहनतीने काम केलं. आता इथून पुढे तुम्ही किती चांगलं निगोशिएट करू शकता याची खरी परीक्षा आहे. आपल्याला हे सगळं करून झाल्यावर काय पाहिजे आहे?
तर हे सगळं भंगार विकल्यानंतर येणारे पैसे आपल्या स्वत:ला ठेवून घेण्याची परवानगी!
त्यात सापडलेल्या आपल्या कामाच्या वस्तू हे बाय प्रॉडक्ट आहे. आणि आपण कशी आपणहून घर आवरायला मदत केली याचं कॅनव्हासिंग करणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळे तुम्ही घरातली एक कामाची आणि महत्त्वाची व्यक्ती आहात असं घरातल्या मोठय़ा माणसांना वाटेल आणि तुम्हाला पुढचे उद्योग करण्यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता वाढेल.
सगळ्यात महत्त्वाचं :हा उद्योग अंघोळीच्या आधीच करा. अंघोळ झाल्याच्या नंतर माळ्यावर चढलात तर कदाचित दिवसभर तिथेच बसून राहावं लागू शकतं