सुट्टी लागली की पहिली गोष्ट आपण काय करतो? तर दिवसभर सतत काही ना काही खातो. करायला काही नसलं की आपल्याला सतत भूक लागते आणि मग आपण आईच्या मागे ‘काहीतरी चांगलं खायला दे’ म्हणून भुणभूण करत फिरतो. पण तिला एक तर तेवढा वेळ नसतो आणि ‘सारखं काय चांगलं देणार खायला?’ असं म्हणून ती आपल्याला डब्यातल्या चिवडा नाही तर लाडूवर कटवते.
असं करण्यापेक्षा आपणच मस्त काहीतरी खायला करायला शिकलो तर??? आपल्याला पाहिजे ते खायला मिळेल आणि शिवाय आईला आपण आयतं खायला करून दिलं तर तीही खूष होईल. अशा वेळी सगळ्यात भारी आणि सोपा पदार्थ कुठला? तर पॉपकॉर्न!
काय लागतं?
त्यासाठी तयार फ्लेवर असलेली रेडिमेड पाकिटं मिळतात. पण साधे सॉल्टेड पॉपकॉर्न करायला त्याची काही गरज नसते. पॉपकॉर्न करायला आपल्याला लागतात साधे कोप:यावरच्या वाण्याकडे मिळणारे मक्याचे दाणो. साधारण एक मूठ मक्याच्या दाण्यांचे पॉपकॉर्न एका माणसाला भरपूर होतात.
तर, करायचं काय?
1. गॅस पेटवायचा. जाड बुडाचं पातेलं किंवा कुकर घ्यायचा. त्यात चमचाभर तेल किंवा बटर घालायचं. ते वितळलं, की आवडत असेल तर चिमूटभर हळद घालायची. त्याने पॉपकॉर्न छान पिवळे दिसतात. पण हळद नाही घातली तरी चालेल.
2. त्या तापलेल्या तेलावर / बटरवर मक्याचे दाणो टाकायचे. त्यावर मीठ घालायचं. ते दाणो लांब दांडय़ाच्या चमच्याने नीट ढवळायचे, म्हणजे प्रत्येक दाण्याला मीठ आणि बटर लागलं पाहिजे. आणि मग चमचा बाहेर काढून त्यावर झाकण ठेवायचं.
3. साधारण दीड ते दोन मिनिटात मक्याचे दाणो आत फुटल्याचा आवाज यायला लागतो. तेव्हा झाकण पूर्ण काढायचं नाही. नाहीतर ते पॉपकॉर्न खूप लांब उडतात. मग तो पूर्ण कुकर अधून मधून हलवत राहायचा.
4. साधारण 5 मिनिटात सगळ्या मक्याच्या दाण्यांच्या लाह्या तयार होतात. आतून लाह्या फुटण्याचा आवाज बंद झाला की गॅस बंद करायचा. एक मिनिट थांबून मग झाकण उघडायचं. लगेच प्लेट घ्यायची आणि सगळ्यांना देऊन गरम गरम पॉपकॉर्न संपवून टाकायचे.
या पॉपकॉर्नला वेगवेगळे फ्लेवर्स देण्यासाठीच्या पावडर्स अनेक शहरात मिळतात. त्यात चीज, कॅरॅमल, पेरी पेरी, शेझवान, टोमॅटो असे बरेच फ्लेवर्स मिळतात. तेही आणून ठेवता येतील.
पण यातली सगळ्यात महत्त्वाची कृती म्हणजे नंतर तो कुकर किंवा पातेलं आपलं आपण घासून ठेवायचं. नाहीतर पुढच्या वेळी आई त्याला हात लावू देणार नाही.