तुम्ही ग्रेटा थनबर्गबद्दल ऐकलंच असेल. वर्षभरापूर्वी स्वीडनच्या संसदेबाहेर एकती हातात फलक घेऊन बसली होती. त्या फलकावर लिहिलं होतं - 'School Strike for climate म्हणजेच, पर्यावरणासाठी शाळा बंद. त्यावेळी कुणी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. एक छोटी मुलगी काहीतरी बोर्ड घेऊन बसली आहे इतकंच महत्व दिलं. तीही जिद्दी. दर शुक्रवारी नेटाने ती हा फलकबाजीचा उद्योग करायची. मग हळूहळू तिची ही शुक्रवारची ?क्टिव्हिटी व्हायरल झाली आणि ग्रेटाच्या निषेध संपात अनेक विद्यार्थी सामील व्हायला सुरुवात झाली. जगभर शेकडोंच्या संख्येने विद्यार्थीतिच्या #FridaysforFuture मोहिमेत भाग घेतला. आजही घेतात. तिला असणारा पाठिंबा बघून संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक परिषदेचं बोलावणं आलं. परिषदेत तिने दणक्यात भाषण तर केलंच पण जागतिक नेत्यांना चांगलं खडसावलं. म्हणाली, ‘आमचं तुमच्याकडे लक्ष आहे. पर्यावरणाबाबत जे घडतंय ते चुकीचं आहे. मी इथे असायला नको. मी शाळेत असायला हवं होतं. लोक मरतायत, त्यांना त्रस होतोय. सगळी पर्यावरण यंत्रणा नष्ट होतेय. आपण विनाशाच्या उंबरठ्यावर आहोत. आणि तुम्ही पैसे,आर्थिक सुबत्तेच्या गप्पा मारताय? पर्यावरणाकडे दुर्लक्ष करण्याची तुमची हिम्मत कशी होते? तुम्ही माझी स्वप्नं विस्कटून टाकली आहेत. माझं बालपण हरवून गेलं आहे!’बापरे! चिमुरडी ग्रेटा पण तिने सगळ्या मोठ्या माणसांना चांगलंच फैलावर घेतलं. खूप ओरडली. मग मोठ्यांनीही तिचं ऐकायचं ठरवलं. तिचे खूप व्हिडीओज युट्युबला आहेत. तुम्ही ते बघू शकता.
काय करा?1) युट्युबवर जा. 2) greta thunberg असं इंग्लिशमध्ये टाईप करा. तिची सगळी भाषण तुम्हाला बघायला मिळतील.