ऑनलाईन गेम्स आवडतात? व्हिडीओज आवडतात? प्राण्यांच्या जगाची सगळी म्हणून माहिती तुम्हाला हवी आहे? जगभरातल्या मुलांचा प्लॅस्टिक विरोधातला लढा काय आहे आणि त्यात तुम्ही कसे सहभागी होऊ शकता?स्पेसपासून निसर्गातल्या विचित्र गोष्टींपयर्ंत तुम्हाला सगळं सगळं समजून घ्यायचं आहे का?मग तुम्ही नॅशनल जिओग्राफिक या जगप्रसिद्ध मासिकाने खास मुलांसाठी बनवलेल्या वेबसाईटवर नक्की जा.
इथे वेगवेगळ्या प्रकारचे निसर्गाशी निगडित ऑनलाईन गेम्स आहेत, कोडी आहेत, असंख्य व्हिडीओ आहेत, पुस्तकं आहे आणि बरंच काही आहे. तुमच्या बाबाशी तुमचं विशेष गुळपीठ असेल ना, पण सिंहाचं त्यांच्या बछड्याशी किंवा पाणघोडा आणि पेंग्विन बाबाचं त्यांच्या मुलांशी कसं नातं असतं माहित आहे का तुम्हाला? तेही तुम्हाला इथे बघायला मिळेल. इथल्या व्हिडीओ विभागात पार्टी एनिमल्स नावाचा उपविभाग आहे. ज्यात खेळणारे प्राणी, काहीतरी गमतीशीर गोष्टी करणारे प्राणी, क्युट प्राणी असे खूप सगळे मस्त मस्त व्हिडीओ आहेत. ते बघताना तुम्हाला खूप धमाल येईल.
या साईटवर कसे जाल?गुगल वर जाऊन national geographic kids पहिलीच साईट त्यांची असेल त्यावर क्लिक करा आणि साईटच्या आत जाऊन धमाल करा.