आई म्हणते, मुलगी असो की मुलगा प्रत्येकाला स्वयंपाक यायला हवा, असं का? मला अजिबात आवडत नाही ते काम!प्रथमेश रिसबुड, पुणे
प्रथमेश, शाळेत आपण माणसाच्या मूलभूत गरजांबद्दल शिकतो. त्या कुठल्या आहेत बरं? अन्न, वस्त्र आणि निवारा. यातलं अन्न हा अतिशय महत्वाचा घटक असतो. तू मोबाईलवर गेम्स खेळतच असशील, किंवा आता लॉक डाऊनमुळे घरात आहेस तर तुङया मित्रमैत्रीणींशीही बोलत असशील आणि बोलता बोलता फोनची बॅटरी गेली तर काय करतोस?फोन चाजिर्ंगला लावतोस बरोबर!अन्न हे पण आपल्या शरीराला रिचार्ज करायचं काम करत असतं. जर अन्न नसेल तर आपण जगू शकतो का? नाही! मग जे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहे, मूलभूत आहे ते आपल्याला बनवता यायला नको का? यात आवडी निवडीचा प्रश्नच नाहीये. स्वयंपाक शिकणं हे जीवन कौशल्य आहे म्हणजे असं कौशल्य जे जगण्यासाठी प्रत्येकाला यायला हवं. तुला माहिते लॉक डाऊननंतर परगावी राहणारे अनेक विद्यार्थी, नोकरीसाठी दुस?्या गावात राहणारे अनेक तरुण यांचे सुरुवातीला खूप हाल झाले कारण लॉक डाऊन नंतर त्यांच्या मेस बंद झाल्या आणि त्यांना स्वयंपाक बनवता येत नव्हता. घरात सामान, गॅस असूनही उपयोग नव्हता कारण तो वापरायचा कसा, एखादा पदार्थ किंवा अगदी वरण भाताचा कुकर लावायचा कसा हेही त्यांना येत नव्हतं. मग त्यातल्या अनेकांनी सुरुवातीचे हाल सहन केल्यावर नंतर त्यांच्या आईला फोन करून व्हॉट्स अँप व्हिडीओ करून स्वयंपाक शिकून घेतला. अशी वेळ कुणावरही कधीही येता कामा नये. कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही आपत्तीत आपल्याला स्वत:ला सांभाळता आलंच पाहिजे आणि त्यासाठी स्वयंपाक आलाच पाहिजे.
दुसरं, स्वयंपाक ही काही फक्त आई किंवा बहिणीची जबाबदारी नाही तर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे तुला आवडत नसलं तरीही आई म्हणतेय ते बरोबर आहे. प्रत्येकाला स्वयंपाक यायलाच हवा. त्यामुळे आता आईच्या हाताखाली स्वयंपाकाचे धडे गिरवायला सुरुवात कर.