अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली होती. त्यानंतर राम मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत आहे. प्राणप्रतिष्ठापणापासून आतापर्यंत जवळपास दीड कोटी लोक रामललाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात आले आहेत, असे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले आहे.
दररोज एक लाखांहून अधिक लोक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठापणापासून आतापर्यंत सुमारे दीड कोटी लोक रामललाच्या दर्शनासाठी आले आहेत, असे चंपत राय म्हणाले. दरम्यान, सध्या मंदिराचा फक्त तळमजला पूर्ण झाला आहे, याठिकाणी रामललाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली होती. पहिल्या मजल्यावर काम सुरू आहे. मंदिराभोवती 14 फूट रुंद सुरक्षा भिंत बांधण्यात येणार आहे. या भिंतीला मंदिराचा 'परकोटा' म्हणतात.
हे मंदिर तीन मजली असणार आहे. प्रत्येक मजल्याची उंची 20-20 फूट असणार आहे. एकूण 2.7 एकर जागेवर राम मंदिर बांधले जात आहे. मंदिराची उंची अंदाजे 161 फूट आहे. मंदिर उभारणी आणि इतर प्रकल्पांना अधिक वेळ लागू शकतो. मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, तळमजला नुकताच बांधण्यात आला आहे. पहिला आणि दुसरा मजला डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल. पण, अयोध्येत देवत्व आणि भव्यता दिसू लागली आहे. येत्या काही दिवसांत येथील भाविकांना त्रेतायुग असाच काहीसा अनुभव येणार आहे. मंदिराच्या रचनेपासून ते शहरी शैलीपर्यंत विशेष आहे.
राम मंदिर ट्रस्टचे म्हणणे आहे की, प्रभू रामाच्या मंदिरासोबतच या परिसरात इतर 7 मंदिरेही बांधली जात आहेत. महर्षी वाल्मिकी मंदिर, महर्षि वशिष्ठ मंदिर, महर्षी विश्वामित्र मंदिर, महर्षी अगस्त्य मंदिर, निषाद राज, माता शबरी, देवी अहिल्या मंदिर असणार आहे. यामुळे लोकांना त्रेतायुग असल्याचे वाटणार आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा सिंह द्वार या नावाने ओळखला जाईल. हे मंदिर पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधले जात आहे. पर्यावरण-जलसंवर्धनावर विशेष लक्ष दिले जात आहे.