अयोध्येतील राम मंदिरात रामलला विराजमान होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 22 जानेवारी 2024 रोजी रामललांची प्राणप्रतिष्ठा झाली. पहिल्या दिवशी केवळ प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांनाच राम ललांचे दर्शन घेण्याची परवानगी होती. यानंत 23 जानेवारीपासून सर्वांसाठी मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले. तेव्हापासून येथे दर्शनासाठी भक्तांच्या रांगा दिसत आहेत. एकट्या 23 जानेवारीलाच जवळपास 5 लाख भाविकांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले. दर्शनासाठी येणारे भक्त प्रभू रामचंद्रांना काहीना काही अर्पण करत आहेत.
अंबानी कुटुंबानं अर्पण केले 10 कोटी रुपये -गेल्या एका महिन्यात रामललांच्या दरबारात काय आले? यासंदर्भात जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यालाही असेल. तर पहिल्य दिवशी अंबानी कुटुंबाने रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला 2.51 कोटी रुपयांची देणगी दिली होती. एवढेच नाही, तर माध्यमांतील वृत्तांनुसार, अंबानी कुटुंबाने एकूण 10 कोटी रुपयांहून अधिकची देणगी राम मंदिराला दिली आहे. याशिवाय इतरही अनेक अब्जाधीशांनी राम मंदिरात मोठ-मोठ्या देणग्या दिल्या आहेत.
एका महिन्यात काया काय आलं? -गेल्या एका महिन्यात तब्बल 60 लाख भाविकांनी रामललांचे दर्शन घेतले असून एकूण 25 कोटी रुपयांहूनही अधिकचे दान केले आहे. हे दान मंदिर परिसरातील दान-पात्र आणि दान काउंटरवर प्राप्त झाले आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राम भक्तांनी या देणग्या रोख, चेक आणि ड्राफ्टच्या स्वरुपात दिल्या आहेत. दुसऱ्या देशांमधून आलेल्या राम भक्तांकडून देण्यात आलेल्या देणगीचा समावेश यात नाही. याशिवाय, भाविकांनी सोने-चांदी आणि रत्नांचे दानही अगदी खुल्या हाताने केले आहे.
भक्तांनी मुक्त हस्ते सोनं-चांदीही केलं अर्पण -प्रभू रामचंद्रांच्या भक्तांनी मुक्त हस्ते सोने-चांदीही अर्पण केलं आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, या एका महिन्यात 25 किलो चांदी आणि 10 किलो सोने भक्तांनी रामलला यांना अर्पण केलं आहे. या सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये मुकुट, हार, छत्री, रथ, बांगड्या आदी. याशिवाय इतर वस्तूंमध्ये खेळणी, दिवे, उदबत्ती स्टँड, धनुष्यबाण आदींचाही समावेश आहे. याच बरोबर भाविकांनी सोन्या-चांदीची भांडी आणि रत्न देखील अर्पण केले आहेत.