राजेंद्र कुमार/एस.पी. सिन्हालोकमत न्यूज नेटवर्कलखनौ/पाटणा: उत्तर प्रदेशात गत पाच दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे ११ जिल्ह्यांना पुराने वेढले आहे. गत पाच दिवसांत ३० जिल्ह्यांत घरे कोसळून आणि विजा पडून २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर नेपाळमधील पावसामुळे रविवारी पहाटे पाच वाजता कोसी, वीरपूरमधून ६,६१,२९५ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. ते ५६ वर्षांतील सर्वाधिक आहे. त्यामुळे बिहार राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
गोरखपूरमध्ये २४ तासांत १५३ मिमी पाऊस झाला आहे. ९५ वर्षांत असे प्रथमच घडले आहे. यापूर्वी १९३० मध्ये २४ तासांत असा मोठा पाऊस झाला होता. उत्तर प्रदेशात हजारो एकरवरील पिके नष्ट झाली आहेत. पावसामुळे अवध भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. अवधच्या आंबेडकरनगरमध्ये भिंत कोसळून दोन वृद्धांसह चार लोकांचा मृत्यू झाला आहे. सुल्तानपूरमध्ये घर कोसळून व वीज पडून दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. लखनौमध्ये गोमती नदीची पाणीपातळी वाढली आहे, तर श्रावस्ती आणि राप्ती या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी पूरस्थितीची माहिती घेतली आणि मदतकार्याच्या सूचना दिल्या. नेपाळमधील मुसळधारेमुळे कुसुमा नदी दुथडी वाहत आहे. ते पाणी राप्तीमध्ये सोडले जात आहे. सिद्धार्थनगर, कुशीनगर, महराजगंजमध्ये अनेक गावांत पाणी शिरले आहे. सोनौलीहून काठमांडू आणि पोखरा येथे जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.
नेपाळच्या पावसामुळे बिहारमध्ये नद्यांचे रौद्र रूपnनेपाळ आणि सीमावर्ती राज्यात सातत्याने होत असलेल्या जोरदार पावसामुळे बिहारमध्ये पूरस्थिती आहे. नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने २० जिल्ह्यांत पुराचा अलर्ट जारी केला आहे. nहवामान विभागाने आठ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. १३ जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. १४० गावांमध्ये पाणी शिरले आहे. १.४१ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. कोसी नदीचे पाणी ज्या प्रमाणात वाढत आहे त्यावरून पूरस्थिती बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.