लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या ( Marathi News ): या बँकेत एकही पैसा नाही, इथे कोणालाही कर्ज दिले जात नाही, कोणतेही आर्थिक व्यवहार होत नाहीत, तरीही या बँकेच्या नावावर आतापर्यंत २० हजार कोटींचे धन जमा झाले आहे. आश्चर्य वाटेल. पण, अशी बँक प्रभू श्री रामाच्या अयोध्या नगरीत आहे. आंतरराष्ट्रीय सीताराम नाम बँक असे तिचे नाव आहे.
जगभरातील लाखो भक्त १९७० पासून या बँकेत राम राम, जय श्रीराम, जय सिया राम असे लिहून वह्या जमा करतात. जगभर बँकेच्या १५० शाखांमध्येही भक्तांनी त्यांच्या हाताने रामनाम लिहिलेल्या वह्या जमा होतात. अनेक रामभक्त टपालाने या बँकेत राम नामाची ही अनोखी पुंजी जमा करतात.
वाल्मिकी रामायणम भवनात ही बँक आहे. या संस्थेचे प्रमुख आणि श्री राम मंदिराच्या आंदोलनात व उभारणीत मोलाचे योगदान देणारे महंत श्री नृत्य गोपाल दास महाराज यांच्या हस्ते २४ नोव्हेंबर १९७० रोजी ही बँक सुरू झाली आणि रामभक्तीत लीन होत लाखो - करोडो भक्तांनी आपल्या हस्ताक्षराने रामनाम गिरवत ते श्रद्धाधन या बँकेत जमा केले. ८२ वर्षांचे पुनित रामदासजी महाराज हे या बँकेचे व्यवस्थापक आहेत.
तीस भाषांमधून राम नाम संग्रह
आजमितीस उर्दू, इंग्रजीसह जवळपास तीस भाषांमधून राम नाम संग्रह पाठविणारे भक्त आहेत. ज्या भक्तांनी पाच लाख किंवा त्यापेक्षा अधिक राम नाम लिहिले आहे, त्यांना बँकेकडून एक पासबुक दिले जाते आणि त्यात राम नामाची संख्या लिहिली जाते. एरव्ही बँकांमध्ये ज्याप्रमाणे हिशेब लिहिले जातात तसे या बँकेत रामनामाची भाषावार नोंद केली जाते.
जेव्हा तुम्ही राम नाम लिहिता तेव्हा...
स्वत: बँकेमार्फत रामनाम लिहिण्यासाठी दोन लाख वह्यांचे मोफत वाटप दरवर्षी केले जाते. याशिवाय अनेक धार्मिक संस्था, व्यक्ती असे मोफत वाटप करत असतात. जेव्हा तुम्ही राम नाम लिहिता तेव्हा आपोआप त्याचा उच्चार तुमच्याकडून होतो. राम नामामध्ये अद्भूत शक्ती आहे आणि ती जगभर यानिमित्ताने पसरावी, त्यानिमित्ताने आस्तिकता समाजात वृद्धिंगत व्हावी, हा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
आमच्या बँकेत आतापर्यंत २० हजार कोटी रामनाम जमा झाले आहेत. एवढे धन ठेवायचे कुठे, हा प्रश्न असतो. मग, दरवर्षी जन्माष्टमीच्या आधी आम्ही त्यातील काही संग्रह शरयु नदीला विधिवत अर्पण करतो. - पुनित रामदासजी महाराज, व्यवस्थापक, आंतरराष्ट्रीय सीताराम नाम बँक