उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील एक फसवणुकीची घटना तब्बल ३१ वर्षांनी उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर तब्बल ३१ वर्षे नोकरी केली. मात्र, निवृत्तीनंतर कोर्टाच्या आदेशाने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सुधीर कुमार असं या व्यक्तीचं नाव असून दीपक टंडन यांनी याप्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. सुधीर यांनी खतौली डेपोत चालक पदावर तब्बल ३१ वर्षे नोकरी केल्याचं टंडन यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
आरोपी सुधीर टंडन हे खतौली बस डेपोमध्ये चालक पदावर नोकरीला होते. त्यांनी तब्बल ३१ वर्षे नोकरी केल्यानंतर ३१ ऑगस्ट २०२१ रोजी ते सेवानिवृत्त झाले. याप्रकरणी दीपक टंडन यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशान्वये खतौली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. आयपीसी ४२०,४६७, ४६८ आणि ४७१ कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधीर कुमार हे गंगा विहार खतौली गल्ली नंबर ७ येथे राहतात. ते मूळ अलावलपूर भोरकाला निवासी आहे. ते मुजफ्फरनगरच्या खतौली बस डेपोत चालक पदावर कार्यरत होता. मात्र, बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने ही सरकारी नोकरी मिळवली. सन १९८९ मध्ये जेव्हा या पदासाठी भरती निघाली होती, तेव्हा ड्रायव्हींग परवानासाठीच्या वयाच्या अटीची पूर्तता तो करू शकत नव्हता. त्यांची जन्मतारीख १५ ऑगस्ट १९६५ आहे. मात्र, कागदोपत्री त्यांची जन्मतारीख १५ ऑगस्ट १९६१ ही आहे. आरटीआयअंतर्गत जनता इंटर कॉलेज सिसौली येथून त्यांच्या जन्मतारखेची माहिती आरटीआय अंतर्गत मिळाली. त्यामुळे, सुधीर कुमार यांनी तब्बल ३१ वर्षे सरकारी नोकरी करुन सरकारची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे.