गेल्या काही दिवसांमध्ये देशातील विविध भागात फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये भीषण स्फोट होऊन अनेकांचा मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. दरम्यान, आज उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यातील फटाक्यांच्या दुकानामध्ये भीषण स्फोट झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या स्फोटामध्ये सुमारे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
स्फोट झाल्यानंतर लागलेली आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाचे अनेक बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही दुर्घटना उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यातील कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भरवारी येथे घडली आहे. कारखान्यामध्ये फटाके तयार करण्यासाठीच्या दारूचा साठा असल्याने कारखान्यातून अजूनही स्फोटांचे आवाज येत आहेत. कारखान्यामधून १० जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. या सर्वांची प्रकृती चिंताजनक आहे. तर सुमारे आठ लोक अद्यापही कारखान्यात अडकून पडले आहेत.
हा स्फोट एवढा तीव्र होता की ज्यामुळे फटाके आणि कारखान्यातील वस्तूंचे तुकडे दूरपर्यंत फेकले गेले. हा फटाक्यांचा कारखाना खलीलाबाद येथील शराफत अली यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. शराफत अली यांच्यासह अनेकजण या स्फोटात होरपळले आहेत. एका मृताची ओखळ पटली असून, त्याचं नाव शिवनारायण असं असल्याचं समोर आलं आहे.जखमी बबलू पटेल, दीना पटेल, अशोक पटेल, कौशल अली आणि शराफत अली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच मुख्यमंत्र्यांनी मदतीचे आणि जखमींवर उपचारांचे आदेश दिले आहेत.