चेन्नई: प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. प्रभू श्रीरामासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून काही ना काही अयोध्येला पाठविले जात आहे. चेन्नईमध्ये बनविलेल्या चांदीच्या भांड्यांमध्ये प्रभू श्रीरामासाठी ५६ भोग सजविले जातील. चेन्नईचे ज्वेलरी व्यावसायिक मिठालाल आदित्य करण पगारिया यांनी सांगितले की, देवाला भोग चढविण्यासाठी चांदीची भांडी अयोध्येत पोहोचली आहेत. ही भांडी खास ५६ भोगसाठी बनविण्यात आली आहेत. चेन्नईसह म्हैसूर, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये यावर खास डिझाइन तयार करण्यात आले आहे. भांडी तयार करण्यासाठी १५ दिवस लागले. प्रत्येक भांड्यावर श्रीराम जन्मभूमी, अयोध्या असे लिहिले होते. राम मंदिराचे पदाधिकारी राजेंद्र सिंह पंकज आणि स्वामीनाथन यांनी चांदीची भांडी बनविण्यासाठी ऑर्डर दिली होती.
सीतामाईसाठी सुरतमध्ये तयार केली खास साडी
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशातील वस्त्रोद्योग निर्मितीच्या मोठ्या केंद्रांपैकी एक असलेल्या सुरतमध्ये एक विशेष साडी तयार करण्यात येत आहे. या साडीवर भगवान राम व राममंदिराची चित्रे असणार आहेत. ही साडी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी अयोध्येला पाठविली जाणार आहे. भगवान राम यांची पत्नी सीता यांच्यासाठी ही साडी तयार केली आहे. या प्रकारची पहिली साडी सीतामाईंना अर्पण केल्यानंतर अशाच पद्धतीच्या आणखी साड्या बनविण्यात येणार आहेत.
ही माहिती वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजक ललित शर्मा यांनी दिली. अयोध्येला पाठविण्यात येणारी विशेष साडी राकेश जैन यांनी बनविली आहे. ज्या मंदिरांमध्ये भगवान राम यांच्यासोबत सीतामाईंचीदेखील मूर्ती आहे, अशा मंदिरांनी विनंती केल्यास त्यांनाही या विशेष साड्या पाठविण्यात येतील, असे शर्मा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
प्राणप्रतिष्ठेनिमित्त अमेरिकेत काढली भव्य कार रॅली
ह्युस्टन: अयोध्येमध्ये येत्या २२ जानेवारी रोजी भगवान रामाच्या मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील हिंदू भाविकांनी ह्युस्टनमध्ये मोठी कार रॅली काढली. तेथील ११ मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेतले. या रॅलीतील भाविकांनी दिलेल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर निनादला होता. अयोध्येतील राममंदिराचे छायाचित्र असलेले भगव्या रंगातील फलक या रॅलीत झळकत होते. ह्युस्टनमधील ११ मंदिरांतील पदाधिकाऱ्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण संस्थेकडून देण्यात आले. (वृत्तसंस्था)