प्रतापगड (उ.प्र.) : देशात ५० टक्के ओबीसी आणि १५ टक्के मागासवर्गीय राहतात तर आदिवासींची संख्या ८ टक्के आहे. केंद्र सरकार या सर्व लोकांचे शोषण करत आहे. असा जवळपास ७३ टक्के वर्ग झोपी गेलेला आहे, त्यांना जागे करण्याचे काम मी करत आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान येथे केले.
राहुल गांधी आपल्या भारत जोडो न्याय यात्रेंतर्गत सोमवारी प्रतापगडला पोहोचले. खुल्या जीपमध्ये बसून त्यांनी नागरिकांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. राहुल यांच्यासोबत काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, अजय राय, मोना मिश्रा आदी उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले, देशातील ७३ टक्के जनता झोपी गेलेली आहे, मी सांगतो. त्यामुळे अग्निवीरसारखी योजना सरकार रेटून नेत आहे. आज नाही तर उद्या ७३ टक्के जनता जागी होईल. माझे काम या ७३ टक्के लोकांना मदत करणे आहे.
ऑफर स्वीकारली तरच यात्रेत येतो
काँग्रेसला उत्तर प्रदेशात लोकसभेच्या १७ जागांची ऑफर देण्यात आली आहे, ती स्वीकारली तरच त्यांचे प्रमुख अखिलेश यादव राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेत रायबरेलीत सहभागी होतील, असे समाजवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. काँग्रेसला कोणत्या जागा देऊ केल्या त्या सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.