कासगंज - उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली. सहावर-एटा मार्गावरील मुहारे घाटानजीक कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत गाडीच्या ड्रायव्हरसह ५ जणांचा मृत्यू झाला. आजारी महिलेच्या उपचारासाठी कारमधील सर्वजण एटा याठिकाणी जात होते. मात्र, वाटेतच दुर्दैवी अपघातात सर्वांनाच जीव गेला.
गंजडुंडवारा क्षेत्रातील नगला उमेद गावातील रहिवाशी, ३५ वर्षीय नीरजची पत्नी विनिता गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. मात्र, रविवारी रात्री विनिताला अधिकच त्रास होऊ लागला. त्यामुळे, नीरजने एटा येथील ओळखीच्या व्यक्तीला फोन केला. फोनवरील संवादानंतर विनिताल एटा येथे नेण्याचे ठरले. त्यासाठी, नीरजन शेजारील गावात राहणाऱ्या मित्राला कार घेऊन बोलावले. नीरजचा मित्र शिवम कार घेऊन आला. त्यानंतर, नीरज, विनिता, शिवम आणि नीरजचे काका-काकूही कारमधून एटाकडे निघाले होते.
अमांपूर सोडल्यानंतर कारने काही वेळातच एटाच्या हद्दीत प्रवेश केला. मात्र, मुहारे घाटानजीक येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार खोल दरीत कोसळली. मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रात्री २ वाजेपर्यंत नीरज एटाला पोहोचला नाही, शिवाय संपर्कही झाला नाही. म्हणून, एटा येथील संबंधित व्यक्तीने नीरजच्या गावातील घरी फोन केला. त्यामुळे, घरातील इतर सदस्य दुसऱ्या कारने नीरज व इतरांच्या शोधासाठी निघाले. त्यावेळी, पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुहारे घाटानजीक काही ग्रामस्थांनी कारचा अपघात झाल्याची माहिती नीरजच्या कुटुंबीयांना दिली.
ग्रामस्थांच्या माहितीनंतर कुटुंबीयांना अपघातस्थळी जाऊन पाहिलं असता, ती कार आपलीच असल्याचे त्यांना समजले. दरम्यान, पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली, पण तोपर्यंत कारमधील ५ ही जणांचा मृत्यू झाला होता.