अयोध्येतील राम मंदिरात रामललांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिल्याच दिवशी राम भक्तांकडून 3.17 कोटी रुपयांचे दानधर्म करण्यात आले. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे ट्रस्टी अनिल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी 10 दान काउंटर उघडण्यात आले होते. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा समारंभानंतर, भक्तांनी दान काउंटर आणि ऑनलाइन देणगीच्या स्वरुपात 3.17 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
मिश्रा यांनी सांगितले, 23 जानेवारीला पाच लाखहून अधिक भक्तांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले. तर बुधवारी रात्री 10 वाजेपर्यंत 2.5 लाखहून अधिक भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले. बुधवारी मिळालेल्या देणगीचा खुलासा पुढच्या दिवशी केला जाईल. तसेच भाविकांना चांगल्या पद्धतीने दर्शन घेता यावे यासाठी प्रशासनासोबत चर्चा करून व्यवस्था केली जात आहे.
यातच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी अयोध्येच्या जवळपास राहणाऱ्या संघ कार्यकर्त्यांना मंदिराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारण्यासंदर्भात आणि मंदिरात दर्शन व्यवस्थितपणे व्हावे, यासाठी सहकार्य करण्यास सांगितले आहे.
रामलला मंदिरात भाविकांची मोठी गर्दी - दुसरीकडे, रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनंतर सर्वसामान्यांसाठी खुल्या करण्यात आलेल्या अयोध्येतील मंदिरात बुधवारी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. सकाळपासूनच रामपथ आणि मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कडाक्याची थंडी, धुके आणि थंडीच्या लाटेत लोक मंदिराबाहेर रांगेत उभे राहत 'जय श्री राम'च्या घोषणा देत होते.