मागील काही महिन्यांपासून रेल्वे अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कधी रेल्वेचे डब्बे रुळावरुन घसरतात, तर कधी अज्ञातांच्या चुकांमुळे रेल्वेचा अपघात होतो. आता उत्तर प्रदेशातील कानपूर येथे असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पण, लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. कानपूरमध्ये रविवारी सकाळी रेल्वे गाडी उलटवण्याचा कट फसला. रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर पाहून लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावरील महाराजपूरच्या प्रेमपूर रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली.
कानपूरहून प्रयागराजच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीच्या लोको पायलटने रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर पाहून प्रसंगावधान दाखवत लगेचच इमर्जन्सी ब्रेक लावला. या घटनेनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. काही दिवसांपूर्वी पंकी औद्योगिक क्षेत्राजवळ साबरमती एक्स्प्रेसचे इंजिन आणि २० बोगी रुळावरून घसरले होते. त्यावेळी देखील रुळावर सिलिंडर टाकून ट्रेन उलटविण्याचाही प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, सकाळी ५.५० च्या सुमारास कानपूरमधील ही घटना घडल्याचे कळते. खरे तर मालगाडीच्या लोको-पायलटने रिकामा ५ लिटरचा सिलिंडर पाहिला आणि अनुचित घटना टाळण्यासाठी आपत्कालीन ब्रेक लावल्याने दुर्घटना टळली.
लोको पायलटमुळे मोठी दुर्घटना टळली. लोको पायलटने तात्काळ या घटनेची वरिष्ठांना माहिती दिली. माहिती मिळताच रेल्वे आयओडब्ल्यू, सुरक्षा दल आणि इतर पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तपासणी करून सिलिंडर रुळावरून काढण्यात आला. सिग्नलच्या आधी ५ लिटरचा रिकामा सिलिंडर ट्रॅकवर ठेवल्याचे सांगण्यात आले. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी ही मालगाडी कानपूरहून प्रयागराजच्या दिशेने जात होती. प्रेमपूर स्थानकाजवळ ट्रेन येताच लोको पायलटला एक गॅस सिलिंडर रुळावर पडलेला दिसला.