उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा पोलिसांनी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. एका ३८ वर्षीय महिलेने तिची मुलगी आणि पुतणीच्या मदतीने कथितपणे ५ जणांना हनीट्रॅपची शिकार बनवले असून, या माध्यमातून तिने गेल्या वर्षभरामध्ये सुमारे १० लाख रुपये उकळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
७ जानेवारी रोजी एका ४० वर्षीय व्यक्तीने सूरजपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर या टोळीचा भांडाफोड झाला आहे. या तक्रारीमध्ये जबरदस्तीने डिजिटल वॉलेटचा पासवर्ड घेतल्याचा आणि १.५ लाख रुपयांचा आरोप करण्यात आला होता.
याबाबत अतिरिक्त डीसीपी (सेंट्रल नोएडा) हिरदेश कठेरिया यांनी सांगितले की, आरोपी महिला ह्या पुरुष व्हॉट्सअॅप युझर्सना मेसेज पाठवून ऑनलाईन मात्री करायच्या. ओपन गृपच्या माध्यमातून या महिला फोन नंबर मिळवायच्या आणि त्यातून सावज हेरायच्या. जर कुणी त्यांच्या मेसेजला प्रतिसाद दिला तर त्या त्याला एखाद्या निर्जन ठिकाणी भेटण्यासाठी बोलवायच्या. जेव्हा हा माणूस तिथे यायचा तेव्हा मुख्य आरोपी कविता चौधरी तिचे दोन साथीदार असलेल्या फारुख आणि विष्णू यांच्यासोबत पोहोचायची. त्यानंतर या व्यक्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला जायचा. जर अशा व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला तर त्याला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली जायची. रविवारी नोएडातील एका खासगी कंपनीतील अधिकारी त्यांची पाचवी शिकार झाला. त्याने तक्रारीत सांगितले की, ७ जानेवारी रोजी एका महिलेने अनोळखी फोन नंबरवरून फोन केला. तिने तिचं नाव कविता असं सांगितलं. तसेच ग्रेटर नोएडामधील देवला गावामध्ये भेटण्यासाठी बोलावले.
पोलीस अधिकारी कठेरिया पुढे म्हणाले, तक्रारकर्त्यांने या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, तो या महिलेला भेटण्यासाठी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गेला. या महिलेला त्याच्या दुचाकीवर बसवले. तसेच या महिनेने सांगितलेल्या पत्त्यावर ते जाऊ लागले. तेवढ्यात मागाहून आलेल्या एका कारने त्यांना थांबवले. त्यातून दोन तरुण उतरले आणि त्यांनी पीडिताला मारहाण करण्यास सुरुवात केली.
या महिलेने आपल्यावर तिच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपा केला. तर या दोन जणांनी त्याला मारहाण केली. त्यांनी आधी तक्रारकर्त्याकडे पैसे मागितले. तसेच डिजिटल वॉलेटचा पासवर्ड शेअर करण्यासही भाग पाडले. तसेच मोबाईल फोनही हिसकावून घेतला.