IPL 2024: आयपीएल म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच... सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. यंदाचा हा हंगाम विविध कारणांनी चर्चेत आहे. अशातच उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक अनोखी घटना समोर आली. इथं आयपीएलचा सामना पाहण्यावरून पती-पत्नीमध्ये बिनसलं आहे. टीव्हीच्या रिमोटवरून दोघांमध्ये भांडण झालं. (Husband Wife IPL Match) खरं तर झालं असं की, पतीला आयपीएल तर पत्नीला मालिका पाहायची होती. पण, घरात एकच टीव्ही असल्यानं ते शक्य नव्हतं. (Agra Husband Wife Fight News)
क्रिकेटचा चाहता असलेला पती दररोज आयपीएलचे सामने पाहत असत. मात्र पत्नीला मालिका पाहायची असल्यानं तिला ते खटकायचं. आपली आवडती मालिका पाहायला मिळत नसल्यानं पत्नीनं तक्रार करत रिमोट हिसकावला. यावरूनच दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं. जे अखेर काउंसलरकडे जाऊन पोहोचलं. मग काउंसलरमधील अधिकाऱ्यांनी पती-पत्नीला कार्यालयात बोलावून त्यांच्याशी चर्चा केली.
असाही कौटुंबिक कलह! पत्नीनं आरोप केला की, पती रोज संध्याकाळी आयपीएल पाहण्यासाठी टीव्हीसमोर बसलेला असतो आणि रिमोट हातातच ठेवतो. पण, यावेळी मला आवडत्या मालिका पाहायच्या असतात. त्यासाठी मी रिमोट मागते मग त्यावरून भांडण होते. रोजच्या आयपीएल सामन्यांमुळं मी वैतागले असून यामुळे मालिका पाहता येत नाहीत.
संबंधित पतीनं आरोप करत म्हटलं की, पत्नी नेहमीच मालिका पाहत असते पण आयपीएल वर्षातून एकदाच असते. त्यामुळे मी आयपीएलचे सामने पाहतो. काउंसलरच्या अधिकाऱ्यांनी दोघांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्यांची समजूत काढली. मालिका सुरू होताच पत्नीच्या हाती रिमोट सोपवण्याचा सल्ला देण्यात आला. तर, जेव्हा मालिका नसेल तेव्हा पतीला आयपीएल पाहू द्यावी, असं पत्नीला सांगण्यात आलं. मग तोडगा निघाल्यावर दोघेही घरी परतले.