थंडी आणि धुरके लोकांचा जीव घेऊ लागले आहे. शाहजहापूरमध्ये भीषण अपघातात १२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. गंगा स्नानासाठी जात असलेल्या भाविकांच्या वाहनाची ट्रकला टक्कर बसली आहे. सकाळी साडे दहा वाजता हा अपघात झाला आहे.
बरेली-फारुखाबाद हायवेवर हा अपघात झाला आहे. १२ जण एका रिक्षात बसून जात होते. मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी या ऑटोमध्ये बसले होते. यामुळे मृतांचा आकडा वाढला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी ट्रकाच्या काचा फोडल्या आहेत. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविले आहेत. पोलीस तपास करत आहेत.
दमगडा गावातील लोक गंगा स्नान करण्यासाठी ऑटोने फारुखाबादमधील पांचाल घाटाकडे जात होते. आल्हागंज येथील सुगुसुगी गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने ऑटोला धडक दिली. त्यामुळे ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या आठ पुरुष, तीन महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला. ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. त्याचा चालक फरार झाला आहे.