वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. मुलीने प्रशासकीय अधिकाऱ्याला इंग्रजीत उत्तर दिल्याने संबंधित अधिकाऱ्याचा पारा चढला. सार्वजनिकरित्या १२वीची विद्यार्थिनी आपल्याला आव्हान देत असल्याचे जाणवताच महिला अधिकाऱ्याने मुलीच्या कानशिलात लगावली. महिला अधिकारी इतकी भडकली की तिने सर्वांसमोरच विद्यार्थिनीला चापट मारली. महिला अधिकाऱ्याच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलीला थप्पड मारल्यानंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केला. मग पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. ही संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील असल्याचे कळते.
वाराणसीतील भीशामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमिनीचा वाद चिघळला असून या वादाचा निकाल उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने एका पक्षाच्या जमिनीचा काही भाग ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे परिसरातील तहसीलदार प्राची केसरबानी या पोलीस फौजफाटा घेऊन जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेल्या होत्या. पोलिसांचा फौजफाटा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
अधिकाऱ्याच्या मुजोरीचा व्हिडीओ व्हायरल दरम्यान, जमलेल्या नागरिकांनी पोलीस आणि महिला अधिकाऱ्याला विरोध केला. "तुम्ही कोणत्या आदेशाच्या आधारे अतिक्रमणाची कारवाई करत आहात", असा प्रश्न नागरिकांनी केला असता महिला अधिकाऱ्याने आदेश इंग्रजीत असल्याचे सांगून नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच इंग्रजीत आलेला आदेश तुम्ही वाचू शकता का? असे देखील अधिकाऱ्याने सांगितले. तेवढ्यात विरोध करणाऱ्या लोकांमध्ये असलेली एक बारावीची विद्यार्थिनीनी पुढे आली. विद्यार्थिनीने इंग्रजीत उत्तर दिल्यावर महिला अधिकारी संतापली अन् तिने विद्यार्थिनीच्या कानशिलात लगावली.
प्रशासकीय अधिकाऱ्याचा संताप कॅमेऱ्यात कैद विद्यार्थिनीने सर्वांसमोर आपल्याला आव्हान दिल्याने संबंधित प्रशासकीय अधिकारी संतापली. घटनास्थळी उभ्या असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.