उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे पोलीस स्टेशन परिसरात एका चौकीत तरूणाचा कोठडीत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी अतिरिक्त सीपी कायदा व सुव्यवस्था आणि डीसीपी सेंट्रल यांना घटनास्थळी पाठवले.
माहितीनुसार, ग्रेटर नोएडातील बिसरख पोलीस स्टेशन परिसरातील चिपियाना चौकीत गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात पोहोचले तेव्हा पोलीस त्याला रुग्णालयात घेऊन जात होते. व्हिडीओ बनवताना कुटुंबीयांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आणि तरुणाचा खून केल्याचा आरोप करायला सुरुवात केली.
कुटुंबीयांचा पोलिसांवर हत्येचा आरोप मृत तरूणाच्या भावाने सांगितले की, पोलिसांनी माझ्या भावाला रात्री पोलीस चौकीत आणले, पाच लाख रुपयांची त्यांनी लाच मागितली, मी ५० हजार रुपये दिले आणि मग त्यांनी दारूसाठी १ हजार रुपये मागितले, मी तेही दिले. ४.५० लाख रूपये सकाळी देतो असे सांगितले. तेव्हा पोलिसांनी मग भावाला सोडणार असल्याचे आश्वासन दिले. पण पोलिसांनी माझ्या भावाची हत्या केली.
दरम्यान, संबंधित तरूणाला पोलिसांनी रात्री अचानक ताब्यात घेतले होते. तेथील एक तरूणी गायब असल्याने चौकशीसाठी त्याला नेण्यात आले होते. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आणि मारहाणीमुळे तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तरुणाने पोलीस चौकीच्या आतील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.