मथुरा - उत्तर प्रदेशच्यामथुरा येथे सोमवारी होळीच्या दिवशी भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. कार आणि दुचाकीमध्ये ही धडक बसली होती. जैत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छटीकरा राधाकुंड रस्त्यावर हा अपघात झाला. होळीच्या दिवशी रंगाची उधळण करत उत्सव साजरा करण्यासाठी हे प्रवासी जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मघेरे येथील हनुमान मंदिराजवळ कार आणि बाईकमध्ये जोरदार धडक बसली. त्यामध्ये, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृत तिघेही एकाच गावातील रहिवाशी असून होळी साजरी करण्यासाठी ते गावातून बाहेर आले होते. तर झाँसी येथील रहिवाशी असलेल्या एका व्यक्तीचाही रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.
पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय वर्मा यांनी अपघाताची माहिती देताना सांगितले की, तोष गावचे रहिवाशी हेमंत बिरजा ठाकुर (25 वर्ष), हुकुम सिंह मेघश्याम ठाकुर (36 वर्ष) व महेश बल्लभ पंडित (25 वर्ष) हे एकाच बाईकवरुन होळी खेळण्यासाठी गावातून बाहेर पडले होते. संध्याकाळी साधारण चार वाजताच्या सुमारास हनुमान मंदिराजवळून जात असलेल्या कारला धडकले. त्यामध्ये, तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कारमधील प्रवाशीही जखमी झाले असून त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, झांसी येथील गांधी गंजनिवासी चंद्रभान कुशवाह बालमुकुंद (46 वर्ष), यांचाही अपघातात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.