लखनौ - भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या देवबंद येथे पोहचताच भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या हल्ल्यात आझाद जखमी झाले असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. आज आझाद यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केले. पोलीस व सत्ताधाऱ्यांचं संरक्षण असल्यामुळेच आत्तापर्यत आरोपी पकडले गेले नाहीत, असेही आझाद यांनी म्हटले.
चंद्रशेखर हे त्यांच्या वाहनाने देवबंद दौऱ्यावर जात होते. तेव्हा अचानक अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळी स्पर्श करून गेल्याने त्यांना दुखापत झाली असून गाडीवर देखील गोळ्यांचे निशाण दिसत आहेत. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी, माध्यम प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला असता, त्यांनी हल्ल्याबाबत सांगताना थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला. आरोपींना सत्तेचं, मुख्यमंत्र्यांचं संरक्षण असल्याचं ते म्हणाले.
हा आजचा हल्ला नाही, वंचितांवर पूर्वीपासूनच असे हल्ले होत आहेत. हा कोणी पहिला वंचित नाही, ज्यावर हल्ला झाला. अशा अनेक घटना घडल्या असून अनेकांना जीव गेलाय. देशात कायद्याचं राज्य आहे, आज माझ्यासारख्या वंचितावर हल्ला झालाय. म्हणजे उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेची काय स्थिती आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. याप्रकरणी गेल्या २४ तासांत काय कारवाई झाली, असा सवाल चंद्रशेखर आझाद यांनी विचारला आहे.