लखनौ : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यात येथील आदित्य श्रीवास्तव अव्वल ठरला. आदित्य प्रत्येक परीक्षेत टॉपवर राहिला, अशी भावना व्यक्त करताना त्याची आई आभा श्रीवास्तव यांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले. आदित्यची गेल्या वर्षी आयपीएसमध्ये निवड झाली. तो सध्या आयपीएसचे प्रशिक्षण घेत आहे, परंतु त्याने यूपीएससी परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नात बाजी मारली.
आदित्य गेल्या वर्षी दुसऱ्या प्रयत्नात पात्र ठरला होता, तेव्हा त्याची रँक २२६ होती. आदित्यची आई आभा श्रीवास्तव गृहिणी आहेत. काका विनोद कुमार हे मसुरी येथील आयएएस प्रशिक्षण केंद्राचे संचालक आहेत. आई आभा श्रीवास्तव यांनी सांगितले, आदित्य लहानपणापासूनच असामान्य होता. तो २ वर्षांचा असताना, त्याच्या वडिलांनी ठरवले होते की, त्याला आयएएस बनवायचे आहे. आयएएस होण्यासाठी ते त्याला सतत प्रेरित करत होते. त्याने दिलेल्या प्रत्येक परीक्षेत तो अव्वल ठरला.
हॅट्स ऑफ सेठजी, मान गये...आदित्यने आयआयटी कानपूरमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केले. त्यानंतर त्याने बंगळुरू येथील अमेरिकी संस्था गोल्डमन सॅक्समध्ये १५ महिने काम केले. त्यानंतर २०२० मध्ये यूपीएससीच्या तयारीसाठी त्याने नोकरी सोडली आणि आज त्याला त्याचे फळ मिळाले.
पहिल्यांदा प्रीमध्ये नापास झाला तरीही...- आदित्यचे वडील अजय श्रीवास्तव कॅगमध्ये ऑडिट अधिकारी आहेत. आपण कार्यालयात असताना, मुलाचा फोन आला आणि तो यूपीएससीत देशात टॉपर ठरल्याचे सांगितले. - हे ऐकून आपण आनंदाने थेट घर गाठले, असे त्यांनी सांगितले. जेव्हा तो पहिल्यांदा प्रीमध्ये नापास झाला, तेव्हा मला थोडी निराशा वाटली. पण, त्याचा स्वतःवर विश्वास होता. स्वतःला भरकटू न देता त्याने फक्त एका ध्येयावर लक्ष केंद्रित केले, असेही ते म्हणाले.
१२ परीक्षा, ७ मेन, ५ मुलाखती तरीही...१२ वेळा परीक्षा दिली. ७ मेन दिल्या. ५ मुलाखती दिल्या, तरी यूपीएससीत यश आलेले नाही, मात्र आयुष्याचे दुसरे नाव संघर्ष असल्याने यश मिळत नसल्याची पोस्ट कुणाल विरुळकर या उमेदवाराने केली असून, ती व्हायरल होत आहे. तुमचा संघर्ष अतिशय प्रेरणादायक असून, तुम्ही जीवनात आणखी काही तरी उत्तम करण्यासाठी जन्माला आला अहात, असे म्हणत नेटकरी त्यांना प्रोत्साहन देत आहेत.