कन्नोज: उत्तर प्रदेशातील कन्नोज जिल्ह्यात पोलीस भरती परिक्षेदरम्यान एक अनोखी घटना समोर आली. येथील सोनश्री मेमोरियल कॉलेजमध्ये पोलीस भरती परीक्षेत अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाने प्रवेशपत्र सापडले. प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखा आणि एसओजी पथकाने संबंधित विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्याची चौकशी केली.
महोबा येथील उमेदवाराचे हे प्रवेशपत्र असल्याचे निष्पन्न झाले. धर्मेंद्र सिंह याच्या प्रवेशपत्रावर सनी लिओनीचा फोटो पाहून तरूणालाही धक्का बसला. पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला सर्व कागदपत्रांसह चौकशीसाठी बोलावले. त्याने अर्जात सर्व अचूक माहिती आणि फोटो अपलोड केल्याचा विद्यार्थ्याचा दावा आहे. पण प्रवेशपत्र काढले असता त्यात अभिनेत्री सनी लिओनीचा फोटो आढळून आला, त्यामुळे तो भरती परीक्षेपासून वंचित राहिला.
सनी लिओनीचे प्रवेशपत्र अधिकाऱ्यांनी ही बाब राज्य भरती आणि पदोन्नती मंडळाला कळवली. अर्ज केलेल्या व्यक्तीची चौकशी करणाऱ्या पोलिसांना संबंधित उमेदवार महोबा येथे असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर एसओजी पथकाने त्याला चौकशीसाठी बोलावले. धर्मेंद्र या तरूणाने सांगितले की, परीक्षेसाठी अर्जाची नोंदणी करताना त्याने सर्व माहिती व फोटो अचूक अपलोड केला होता. प्रिंट आऊट काढल्यावर नाव आणि फोटो सगळे बरोबर होते. मात्र, परीक्षेच्या एक दिवस आधी ॲडमिट कार्ड जारी करण्यात आले तेव्हा त्यावर अभिनेत्री सनी लिओनीचा फोटो होता.
धर्मेंद्रची पोलिसांकडून चौकशी धर्मेंद्र दोन वर्षे प्रयागराज जिल्ह्यात राहून पोलीस भरतीची तयारी करत आहे. महोबा येथे त्याने ४ जानेवारी रोजी एका खासगी कॅफेमधून भरतीसाठी अर्ज केला. १७ फेब्रुवारीला तो कन्नौज येथील केंद्रावर परिक्षेसाठी गेला होता, मात्र प्रवेशपत्रात बदल झाल्यामुळे तो परीक्षेला बसू शकला नाही. पोलिसांनी सांगितले की, महोबाच्या सायबर कॅफेमधून पोलीस भरतीसाठी फॉर्म भरला होता. ॲडमिट कार्डमध्ये सनी लिओनीचा फोटो दिसत आहे. त्यामुळे एसओजी पथकाने त्याला चौकशीसाठी बोलावले आहे.